बंगळूर : अहिंद नेते पुन्हा एकत्र येण्याचा मुद्दा नाहीच. कारण, जेव्हा जेव्हा अहिंद चळवळीशी संबंधित प्रश्र्न उपस्थित होतात, तेव्हा सर्वजण एकजुटीनेच काम करतात. आता एसआयआर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोणतीही बैठक घेतली जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
कोणत्याही बाबींवर मतभेद असू शकतात; परंतु अहिंद चळवळीबाबत आमच्यात पूर्ण एकता आहे; मात्र तूर्त स्नेहभोजनाचा विचार नाही. एसआयआर प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत दुसरा कोणताच मुद्दा नाही. सध्या दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एसआयआरविरोधात आंदोलन सुरू आहे. मीसुद्धा दिल्लीला जाणार आहे. कर्नाटकातील नेते वेगवेगळ्या दिवशी या आंदोलनात सहभागी होत आहेत, असेही जारकिहोळी म्हणाले.