बेळगाव : ’सबमिशन नको, आय वॉन्ट सोल्युशन’ (अहवाल सादरीकरण नको, मला उपाय पाहिजे) असे म्हणत पुढील दोन महिन्यात पाण्याची समस्या उद्भवू नये, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उद्या पाण्याची समस्या उद्भवल्यास कारवाई करण्याचा इशारा चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या दिला.
शहरातील नगर परिषदेच्या नूतन कार्यालयाच्या सभागृहात चिकोडी मतदारसंघातील विविध गावांमधील पाणी पुरवठा व पाणी समस्याविषयी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार हुक्केरी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध गावांमधील जल जीवन मिशनसह पिण्याच्या पाण्याच्या योजना वेळेवर पूर्ण करावे, अशा कडक सूचना दिल्या. एकसंबा, चिकोडी, सदलगा पाणीयोजनांचे काम वेळेत न झाल्यास काम करणारे एजन्सी व अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याची सूचना आमदारांनी दिली. तसेच पुढील तीन महिन्यांमध्ये विजेची टंचाई जाणवू नये याची खबरदारी वीज महामंडळाने घ्यावी, अशी सूचना केली.
बैठकीत विविध ग्रामपंचायतचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी मांडत होते. त्यावर संतापलेले आ. हुक्केरी म्हणाले, इतके दिवस गप्प बसून ऐन उन्हाळ्यात बैठकीत गाऱ्हाणे मांडत आहात. तुम्ही इतके दिवस काय केले? शेतमळ्यातील पाण्याची समस्या सोडविण्याची सूचना करत पाणीपुरवठा खात्याचे अभियंताना धारेवर धरले.
पाणीपुरवठा खात्याकडून पाईपलाईनचे काम संथगतीने सुरू असल्याची बाब लक्षात आल्यानंतर आमदार हुक्केरी यांनी कर्नाटक पाणीपुरवठा खात्याचे अभियंता राजेंद्र हिरेकुडे यांना चांगलेच धारेवर धरत त्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. चिकोडीचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी जगदीश इट्टी म्हणाले, चिकोडी शहरात सरकारी आठ विहिरी स्वच्छ करून वापरासाठी सज्ज ठेवल्या आहेत. तसेच शहरात 16 कूपनलिका खोदल्या जाणार आहेत.
एकसंब्याचे मुख्याधिकारी महांतेश निडवणी म्हणाले, महाराष्ट्रातील काळम्मावाडी धरणातून पाणी दूधगंगा नदीला येणार आहे त्यामुळे पुढील 25 दिवस तरी पाण्याची समस्या उद्भवणार नाही. यावेळी जलजीवन मिशन योजनेवरून अभियंता नाईकवाडी व अन्य अभियत्यांमध्ये बैठकीत वाद झाला. यावेळी केरूर, मलिकवाड, हिरेकुडी, नाइंग्लज, नवलीहाळ, खडकलाट, पट्टणकुडी, एकसंबा, सदलगा, जोडकुरळीसह विविध गावांमधील पाणी समस्येचा आढावा घेतला.
बैठकीत व्यासपीठावर प्रांताधिकारी सुभाष संपगावी, तहसीलदार राजेश बुरली, जलजीवन मिशन व पाणीपुरवठा खात्याचे अभियंता पांडुरंग, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रवीकुमार हुक्केरी, सदलगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर रुगी, चिकोडी नगर परिषदेचे अभियंता मल्लिकार्जुन महाजन होते.