Belgaum | ड्रेनेजमध्ये कचरा; कारवाई करा; आरोग्य स्थायी समिती बैठक 
बेळगाव

Belgaum | ड्रेनेजमध्ये कचरा; कारवाई करा; आरोग्य स्थायी समिती बैठक

कामगारांच्या अल्पोपहारासाठी निविदा काढणार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील अनेक हॉटेलचालक कचरा मुख्य सांडपाणीवाहिनीत टाकत आहेत. त्यामुळे, वाहिन्या अनेक ठिकाणी तुंबत असून सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र चेंबर नसलेल्या हॉटेलचालकांवर कारवाईचा निर्णय आरोग्य स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी (दि. ३१) लक्ष्मी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी पावसाळ्यात सांडपाणी वाहिनी तुंबुन राहत असून पावसाच्या पाण्याला मार्ग मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. हॉटेल बांधकाम करताना किंवा हॉटेलसाठी व्यापार परवाना देताना तेथील कचऱ्याच्या निचऱ्यासाठी वेगळ्या चेंबरची सक्ती असतानाही तशी सोय केलेली नाही. त्यामुळे, सर्व हॉटेलांची पाहणी करुन त्यांना कचऱ्यावर प्रक्रियेसाठी बायोगॅस किंवा वेगळ्या चेंबरची सोय करावी, जे हॉटेलचालक कचरा सांडपाणी वाहिनीत टाकत आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असा निर्णय घेण्यात आला. या कचऱ्याबाबत हॉटेलचालक संघटनेला पत्र लिहिण्याचेही ठरले.

सर्व सफाई कामगारांची रोज बायोमेट्रीक हजेरी सुरु करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर सफाई कामगारांच्या रोजच्या अल्पोपहारासाठी नव्याने निविदा काढण्याचा ठराव संमत करण्यात आला. याशिवाय गोशाळेलाही मान्यता देण्यात आली. यावेळी महापौर प्रीती कामकर, सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर, सदस्य नितीन जाधव, अभिजीत जवळकर, वैशाली भातकांडे, कौन्सिल सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर, कायदा सल्लागार भीमराव जिंग्राळकर, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, अशोककुमार सज्जन व इतर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT