बेळगाव ः पहलगामला इतकी मोठी घटना घडलेली असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावात येऊन नाटक करत आहेत. पोलिस अधिकार्यावर हल्ला, धमकी देऊन काँग्रेस सरकारची हिटलरशाही सुरु असल्याचा आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला. काँग्रेसत्या सभेनंतर ते सोमवारी (दि. 28) कन्नड साहित्य भवनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. खासदार इराण्णा कडाडी यावेळी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांना सोडा म्हणून पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या महिलांना तेथून पळवून लावण्याचे आदेश काँग्रेस सरकारने दिले. ही हिटलरशाही नव्हे तर काय आहे? पहलगामला जी घटना घडली त्याचा निषेध सर्व देश करत आहे.
परंतु, ते सोडून सिद्धरामय्या येथे येऊन नाटक करत आहेत. त्यांच्या या नाटकामुळे ते पाकिस्तानमधील चॅनेलचे हिरो बनले आहेत. पोलिस अधिकार्यावर हात उगारणे, धमकी देणे, आंदोलनकर्त्या महिलांना ठाण्यातून पळवून लावणे, ही हिटलरशाही असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
खासदार कडाडी म्हणाले, सर्व देश पहलगामच्या दुःख़ात असताना लोकभावना दुखावतील, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांकडून झाले आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते गेलेले असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, हे कितपत योग्य आहे. त्यांना तातडीने सोडा अन्यथा 10 हजार महिलांना एकत्रित करुन आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.