कारवार : अब्दुल अल-सईद हे अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर बनून इतिहास घडवत असताना दुसरीकडे कर्नाटकातील भटकळमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण सईद यांची पत्नी सारा जुकाकू यांचे मूळ भटकळमध्ये आहे.
जुकाकू कुटुंब हे नवायथ समाजाचे असून, तो येमेन, अरब, इराण व इराक येथून आलेला एक प्राचीन मुस्लिम व्यापारी समाज आहे. गेल्या ६०० वर्षांपासून दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या शहरांमध्ये स्थायिक झाला आहे. साराचे आजोबा जुकाकू शमसुद्दीन एक प्रख्यात वकील होते. त्यांनी १९५० च्या दशकात मुख्यमंत्री बी. डी. जत्ती यांच्या नेतृत्वाखालील म्हैसूर सरकारमध्ये उपअर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते.
शमसुद्दीन यांना सहा मुली व चार मुलेे होते. त्यांचे पुत्र डॉ. तय्यब जुकाकू हे साराचे वडील व अल-सईदचे सासरे आहेत. नेफ्रॉलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) असलेले डॉ. तय्यब यांनी अमेरिकेत स्थलांतर करण्यापूर्वी बंगळूरमध्ये एमबीबीएस पूर्ण केले. सारा व एल-सईद यांची भेट मिशिगन विद्यापीठात विद्यार्थी असताना झाली. तिथे दोघेही मुस्लिम विद्यार्थी संघटनेचे सक्रिय सदस्य होते. या जोडप्याने मे २००६ मध्ये लग्न केले.
मी जास्त भारतीय
माझं लग्न होऊन २० वर्षे झाली आहेत. मी एका दक्षिण भारतीय कुटुंबात आहे. आता मी त्यात चांगलाच रुळलो आहे. तुम्हाला माहीत आहे का? मी अरब असण्यापेक्षा जास्त भारतीय असेन, असे नूतन सिनेटर अल सईद यांनी एका पूर्वीच्या मुलाखतीत म्हटले होते.