बेळगाव

बेळगाव : तरुणाच्या खुनानंतर गोकाकमध्ये तणाव; सात जणांना अटक

दिनेश चोरगे

गोकाक; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावरील काम संपवून घरी जाणार्‍या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना रविवारी रात्री गोकाक शहरात घडली. यानंतर संतप्त जमावाने संशयित खुन्यांच्या घरांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. खूनप्रकरणी सात जणांना अटक केली असून, यामध्ये एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.

शानूर ऊर्फ संतोष पुजारी (वय 25, रा. आदीजांबवनगर, गोकाक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो पेट्रोल पंपावर काम करत होता. अटक झालेल्यांमध्ये सुनील काडाप्पा म्हेत्री वय 25), शिवकुमार ऊर्फ शिवू बसवराज म्हेत्री (24), वासुदेव ऊर्फ वासू मुत्ताप्पा म्हेत्री (20), काडाप्पा दुर्गाप्पा म्हेत्री (54), संजय म्हेत्री (26) व हणमंत म्हेत्री (वय 27, सर्वजण रा. आदीजांबवनगर, गोकाक) यांच्यासह एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पेट्रोल पंपावर काम करणारा शानूर रविवारी रात्री आपले पेट्रोल पंपावरील काम संपवून घरी निघाला होता. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने त्याचा खून केला. त्यानंतर सर्वजण फरारी झाले. हा खून पूर्ववैनस्यातून क्षुल्लक कारणातून झाला आहे. खुनाची माहिती कळताच 100 जणांचा जमाव एकत्रित येऊन त्यांनी संशयितांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. शिवाय काही वाहनांवर दगडफेक करत नुकसान केले. गोकाक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बंदोबस्त ठेवला. परंतु, रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर या भागात तणाव होता.

पोलिस प्रमुखांची भेट

जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी गोकाक शहराला भेट दिली. आदीजांबव नगर परिसरातील बंदोबस्ताची त्यांनी पाहणी केली. शिवाय भविष्यात तणाव नको म्हणून त्यांनी येथे दोन उपअधीक्षक, चार निरीक्षक, 6 उपनिरीक्षक व जिल्हा सशस्त्र दलाची दोन पथके बंदोबस्तावर ठेवली आहेत. प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार पोलिसांनी दिवसभरात एका अल्पवयीनसह सात जणांना अटक केली.

SCROLL FOR NEXT