10 मर्सिडिजइतका महागडा 50 कोटींचा ‘वुल्फडॉग’! Pudhari File Photo
बेळगाव

10 मर्सिडिजइतका महागडा 50 कोटींचा ‘वुल्फडॉग’!

बंगळूरमध्ये खरेदी; सध्याचे वय 8 महिने... उंची 30 इंच... वजन 75 किलो

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : बंगळूर येथील एका श्वानप्रेमीने एका ‘वुल्फडॉग’ची थोड्याथोडक्या नव्हे, तर 50 कोटी रुपयांना खरेदी केली असून, हा ‘वुल्फडॉग’ आता जगातील सर्वात महागडा श्वानदेखील ठरला आहे. त्याने या श्वानासाठी जी किंमत मोजली, त्यात चक्क 10 मर्सिडिजदेखील सहज आल्या असत्या, ही वस्तुस्थिती अर्थातच थक्क करणारी ठरते आहे. मसिर्र्डिज बेंझ कारच्या टॉप मॉडेलची किंमत 4 ते 5 कोटी रुपये आहे. म्हणजेच या श्वानाच्या खरेदी किमतीत किमान 10 मर्सिडिज घेता आल्या असत्या.

‘कॅडाबॉम्ब ओकामी’ असे या ‘वुल्फडॉग’चे नाव आहे. हा जगातील एक दुर्मीळ श्वान आहे. तो वुल्फ आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्या संकरातून जन्माला आला आहे. त्याचे वय सध्या 8 महिने असून, वजन 75 किलो इतके, तर त्याची उंची 30 इंच इतकी आहे. दरम्यान, कॉकेशियन शेफर्ड ही प्रजात त्यांच्या अतुल्य ताकदीसाठी आणि जाड फरसाठी ओळखली जाते. सहसा ही प्रजात जॉर्जिया आणि रशिया अशा थंड प्रदेशात आढळते. लांडगे व इतर वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी प्रामुख्याने या श्वानांचा उपयोग केला जातो.

कुत्र्यांच्या शोमधून एस. सतीश यांची बक्कळ कमाई...

एस. सतीश हे एक प्रसिद्ध कुत्रा प्रजनक असून, इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे प्रमुख आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी श्वान प्रजनन व्यवसाय सोडला असला, तरी आता ते आपल्या दुर्मीळ कुत्र्यांचे प्रदर्शन करून उदरनिर्वाह करतात. त्यात अर्ध्या तासासाठी 2 लाख 46 हजार 705 रुपयांपासून ते 5 तासांच्या इव्हेंटसाठी 10 लाख 9 हजार 251 रुपये इतकी कमाई ते करतात. सतीश यांनी शेतामध्ये 7 एकरांत फार्महाऊस तयार केले आहे. येथे प्रत्येक कुत्र्यासाठी 20 बाय 20 फूट आकाराची स्वतंत्र रूम आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी येथे 10 फूट उंच भिंती असून, हा परिसर 24 बाय 7 सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे. सतीश यांच्याकडे लाल पांडासारखा दिसणारा चाऊ चाऊ कुत्राही आहे.

काय आहे ‘वुल्फडॉग’चे वैशिष्ट्य?

हा वुल्फडॉग त्याच्या प्रजातीचा असा एकमेव श्वान आहे. जंगली लांडगा आणि कॉकेशियन शेफर्ड या दोन श्वानांच्या संकरातून या वुल्फडॉगचा जन्म झाला आहे. त्यामुळेच तो जगातला सर्वाधिक महागडा वुल्फडॉग ठरला आहे. बंगळूरच्या एस. सतीश यांनी 4.4 मिलियन पाऊंडला याची खरेदी केली. त्याची भारतीय चलनात तब्बल 50 कोटी रुपये किंमत होते.

प्रीमियरच्या अभिनेत्याइतकेच आम्ही लोकप्रिय

शोला मिळत असलेल्या आतापर्यंतच्या अनुभवावरून सतीश म्हणाले की, ओकामी एक अत्यंत दुर्मीळ असे ब्रीड आहे आणि तो हुबेहुब लांडग्यासारखा दिसतो. यापूर्वी या ब्रीडच्या श्वानाची कधीही विक्री झालेली नाही. या वुल्फडॉगसाठी अमेरिकेत संकर घडविला गेला होता. या श्वानासाठी मी 50 कोटी रुपये मोजले आहेत. माझ्याकडील श्वानांबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते. लोक सेल्फी घेतात, फोटो काढतात. एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियरला गेलेल्या अभिनेत्याइतकेच मी आणि माझा कुत्रा लोकप्रिय आहोत आणि आम्हाला पाहण्यासाठी गर्दी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT