बंगळूर : बंगळूर इलेक्ट्रॉनिक सिटी उपविभागातील १० पोलिस ठाण्यांच्या अखत्यारीत ताब्यात घेण्यात आलेल्या एकूण ३९ बांगला देशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले असून, पश्र्चिम बंगालमधील मालदा सीमेवर सोडण्यासाठी त्यांना सोमवारी रवाना करण्यात आले. सर विश्वेश्वय्या रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या ट्रेनमधून ३१ जणांसाठी विशेष डब्याची व्यवस्था करण्यात आली, तर उर्वरित ८ जणांना पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात विमानाने नेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत कर्नाटकातून ९११ अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यात आले आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर करून शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अटक करण्यासाठी शहर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम सुरू आहे. व्हिसाची मुदत संपलेली असतानाही हे लोक बंगळुरात राहत असल्याचे आढळून आले. त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्व ३९ बांगला देशी नागरिकांना २० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाखाली पश्चिम बंगालच्या मालदा सीमाभागात नेण्यात आले आहे. मालदा सीमाभागात पोहोचल्यानंतर तेथील सीमा सुरक्षा दल व इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर नियमांनुसार त्यांना बांगला देशी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
बंगळूर पोलिसांनी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना शोधण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी ‘ऑपरेशन मुक्त’ नावाची विशेष मोहीम राबवली होती. शहरातील व्हाईटफिल्ड व इलेक्ट्रॉनिक सिटी भागांमध्ये राबवण्यात आलेल्या या मोहिमेत २ हजार ९४४ संशयितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात १०५ बेकायदेशीर बांगला देशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली होती.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ पर्यंत राज्यातून ४२७ परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. यापैकी २८६ जण बांगला देशी नागरिक आहेत. २०२५ मध्ये ४०१ व २०२४ मध्ये ३३९ परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत कर्नाटकात ९११ अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यात आले आहे. पैकी ८६८ जण बांगला देशी आहेत. यापैकी ३६५ जण गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे.