कारदगा : येथील साहित्य विकास मंडळातर्फे आयोजित 29 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत 5 सत्रात होत आहे. या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनातून रसिकांना साहित्याची मेजवानी मिळणार आहे. संमेलनासाठी डॉ. यशवंत पाटणे अध्यक्ष आहेत.
सीमाभागातील या संमेलनात मराठी साहित्याचा जागर होणार असून श्रोत्यांना एक पर्वणी असते. संमेलन दर्जेदार होण्यासाठी साहित्य विकास मंडळातर्फे नेटके नियोजन करण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी 8 ते 9:30 ग्रंथदिंडी, त्यानंतर 10 ते 1 उद्घाटन सत्र, पुस्तक प्रकाशन, दुसरे सत्र व्याख्यान, तिसरे सत्र कथाकथन, चौथे सत्र कवी संमेलन व पाचव्या सत्रात संस्कृतीचा लोकरंग कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, आण्णासाहेब हवले यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन. भरत माणगावे यांच्या साहित्य नगरीचे उद्घाटन, डॉ. एस. बी. शिंदे यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन होणार आहे. कारदगा ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती कांबळे या स्वागताध्यक्षा आहेत.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, सुनीलकुमार लवटे व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी भव्य शामियाना उभारला असून महिला व पुरुष रसिकांना बसण्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक प्रदर्शनासाठी जागा, जेवण विभागाचे नेटके नियोजन केले आहे.