बसुर्ते, उचगाव, बेकीनकेरेची 250 एकर शेती जाणार Pudhari Photo
बेळगाव

बसुर्ते, उचगाव, बेकीनकेरेची 250 एकर शेती जाणार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

रिंग रोडसाठी भूसंपादन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना बसुर्ते, उचगाव, बेकीनकेरे भागातील 250 एकर जमीन संपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यमकनमर्डी मतदारसंघातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 2.7 टीएमसी क्षमतेचे धरण बसुर्ते परिसरात बांधण्यात येणार आहे. त्यासाठी शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप निर्माण झाला असून याविरोधात न्यायालयात धाव घेण्याची काही जणांनी तयारी चालविली आहे.

  • पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवणार

  • लघु पाटबंधारे विभागाचा डॅमचा प्रस्ताव

  • 2.7 टीएमसी क्षमतेचे धरण बांधणार

  • राकसकोप धरणाची क्षमता अर्धा टीएमसी

  • लघु पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव

बेळगाव तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांच्या हजारो एकर जमिनी वेगवेगळ्या कामांसाठी यापूर्वी संपादित केल्या आहेत. रिंगरोडसाठी सर्व्हे करण्यात आला आहे. जमिनी संपादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात म. ए. समितीने आंदोलन छेडले. परंतु, अनेक शेतकर्‍यांनी सहकार्य केले नसल्याने रिंगरोडचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पश्चिम भागातील उचगाव, गोजगा, तुरमुरी, बाची परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. त्यानंतर धरण उभारणीसाठी भूसंपादन करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. बसुर्ते, उचगाव, बेकीनकेरेच्या सीमेवर असणार्‍या जागेत धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लघुसिंचन विभागाने योजना तयार केली आहे. याठिकाणी 2.7 टीएमसी क्षमतेचे धरण उभारण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील 250 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

बसुर्ते, उचगाव, बेकीनकेरेचा भाग हा चंदगड तालुक्याच्या सीमेवर आहे. चंदगड तालुक्यातील महिपाळगड, देवरवाडी डोंगराच्या रांगा या भागात आल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे याच भागात धरण उभारण्यात येणार आहे. हे पाणी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील काही गावांसाठी नेण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यमकनमर्डी मतदारसंघातील काही गावांना लागू करण्यात येणार आहे. परिणामी, शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

न्यायालयात धाव घेणार

नियोजित धरणासाठी 250 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. याविरोधात काही शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालवली आहे.

लघु पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव

पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग कार्यरत असतो. बसुर्ते धरणाची संकल्पना याच विभागाची आहे. त्यासाठी शेतजमीन संपादित केली जाणार आहे. हे पाणी उपसा सिंचन पद्धतीने देवरवाडी डोंगराच्या पायथ्यापासून उचलून डोंगराच्या पलिकडे असणार्‍या हुक्केरी तालुक्यातील गावांना तसेच बेळगाव तालुक्यातील काही गावांना पुरवले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT