धारवाड : धारवाड-हुबळी जुळ्या शहरांमधील सर्व प्रभागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या बहुचर्चित प्रकल्पाची अंमलबजावणी पुढील जूनपर्यंत होणे अपेक्षित असून, प्रकल्प ८५ टक्के पूर्ण झाला आहे. पुढच्या जूनपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र बेळगावला २४ तास पाणी अजूनही हवेतच आहे. त्यामुळे हुबळी-धारवाडचा प्रकल्प पूर्ण होत असताना बेळगावला २४ तास पाणी कधी, हा प्रश्र्न आहे.
अनियमित पाणीपुरवठा असलेल्या ४० प्रभागांमध्ये या प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या १.२० लाख घरगुती सेवा जोडण्यांपैकी २४ तास पुरवठ्यासाठी ६४ हजार म्हणजे सुमारे निम्म्या जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत एल अँड टी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रकल्प अंमलबजावणीवर देखरेख ठेवणाऱ्या कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशनने जमा केलेल्या आकडेवारीनुसार, जुळ्या शहरांमध्ये विकसित केल्या जाणाऱ्या १,६८८ किमी वितरण नेटवर्कपैकी, ऑक्टोबरअखेरपर्यंत १,३२७ किमी नेटवर्क आधीच टाकण्यात आले आहे.
सौंदत्ती जॅकवेल ते अम्मीनभावीपर्यंत मुख्य जलवाहिनी २९ किमीची असून ती घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. अम्मीनभावी आणि रायपूर दरम्यानच्या ७५ किमी वाहिनीपैकी ७४ किमी शुद्ध पाण्याची वाहिनी घालण्यात आली आहे. अम्मीनभावी जलशुद्धीकरण प्रकल्प व २२ तलावांच्या पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती केयूआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एकूण ८५ टक्के प्रगती झाल्यामुळे, हा प्रकल्प पुढील वर्षी जूनपर्यंत पूर्ण होईल, असे केयूआयडीएफसीच्या अधीक्षक अभियंता सविता कटिगेन्नवर यांनी सांगितले. प्रभागांमधील जोडण्यांना अधिकृतपणे दर दोन ते सहा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे, मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा पाईपलाईनला गळती लागल्यास त्यात आणखी विलंब होतो.
८२ प्रभागांतील १.८६ लाख जोडण्यांपैकी, १३ डेमो झोनमधील १७,१२० जोडण्यांना चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे, तर २९ प्रभागांतील ४४,७६९ जोडण्यांना दररोज पाणीपुरवठा होतो. उर्वरित ४० प्रभागांपैकी, २२ प्रभागांमध्ये दोन ते चार दिवसांनी आणि १८ प्रभागांमध्ये पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. जागतिक बँकेच्या सहाय्याने उभारलेल्या ९३१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी दिलेला पाच वर्षांचा कालावधी जून २०२५ मध्ये संपला होता. आता अंतिम मुदत आता जून २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.