बेळगाव : एका खटल्यात वकिलाच्या समर्थनार्थ तब्बल 200 वकिलांनी काम पाहिल्याचा प्रकार नुकताच मुडलगी न्यायालयात घडला. विशेष म्हणजे हे सर्वच वकील न्यायालयात उपस्थित होते. वकिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात सर्वजण त्यांच्या बाजूने कामकाज करत असल्याने या खटल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे.
मुडलगी शहरातील ज्येष्ठ वकील सुधीर गोदीगौडर यांच्या कुटुंबातील वैयक्तिक वादाबाबत झालेल्या न्यायालयीन कामकाजात गोकाक आणि मुडलगी न्यायालयातील 200 हून अधिक वकिलांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला. दिवाणी खटल्यात शेकडो वकिलांनी भाग घेतला, ही उल्लेखनीय बाब ठरली आहे. यावेळी ॲड. सुधीर यांनी प्रतिवादीच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले.
यावेळी ज्येष्ठ वकील आर. एच. इटनाळ, गोकाक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सी. डी. हुक्केरी, बी. एल. मळेद, ॲड जी. एम. भट्टी, ॲड एस. डी. पत्तार, ॲड बी. बी. खानापूर, ॲड एस. एल. पाटील यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.