बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघवडे गावातील मार्कंडेय नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत १५ जणांना अटक केली. या कारवाईत संशयितांकडून ६९ हजार १५० रूपये तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने वाघवडे येथील मार्कंडेय नगरमधील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत १५ जणांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिषेक भोसले, परशुराम शिंदे, पिरिमल जालगार, रोहन शिंदे, महेश गोरल, श्रीकांत भस्मे, भरमाप्पा पाटील, शुभम शिंदे, राहुल अगसगेकर, रोहित कांबळे, विनायक बडण्णावर, सुनील पॅटरोट, प्रकाश नाईक, मनीष असुदेकर, सागर पाटील यांचा समावेश आहे.
या संशयितांकडून रोख रक्कम आणि खेळासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या कारवाईबद्दल शहर पोलिस आयुक्त तसेच पोलिस उपायुक्तांनी पीएसआय संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.