बेळगाव : पाच वर्षांपासून 9 वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये स्थूलपणा दिसून येत आहे. त्यामुळे पीएम पोषण अभियानांतर्गत सरकारी व अनुदानित शाळांमध्ये देण्यात येणार्या माध्यान्ह आहारामध्ये तेलाचा वापर 10 टक्के कमी करण्याची सूचना देण्यात आली आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा सल्ला दिला होता. त्यानुसार शिक्षण खात्याने आदेश बजावला आहे.
केंद्रीय शिक्षण खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीचे पालन केले जात आहे. माध्यान्ह आहारांतर्गत 1 ली ते 5 वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 7.5 ग्र्रॅम तेलाचा वापर केला जातो. संपूर्ण देशात 1990 मध्ये 0.4 दशलक्ष मुलांमध्ये स्थूलपणा आढळला होता. 2022 मध्ये हा आकडा 12.5 दशलक्ष वर पोहोचला आहे. यामुळे मुलांमध्ये आळशीपणा, हृदयरोग, अपचन असे त्रास दिसून येत आहेत. या समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाय सूचविला आहे. माध्यान्ह आहारामध्ये 10 टक्के तेल कमी वापरण्यास त्यांनी सांगितले. याची अंमलबजावणी बहुतांश शाळांमध्ये केली जात आहे. आरोग्यदायक जीवनशैली, फळभाज्या, ताजे अन्न खाणे, योग, खेळ, व्यायाम करण्याविषयी शिक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात आहे. याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरिता कार्यशाळा, व्याख्यानांचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
तेलाचा कमी वापर करुन स्वयंपाक करण्याविषयी संबंधित संस्थांकडून मार्गदर्शन घ्यावे. आरोग्यदायक आहार पद्धतीवर प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावी. शाळा आवारात भिंतींवर पोस्टर, बॅनर चिकटवावेत. मुलांमध्ये वाढता स्थूलपणा धोका आहे. मुलांमधील स्थूलपणा वेळीच ओळखून मार्गदर्शन करावे, असे शिक्षण खात्याच्या आदेशात म्हटले आहे.
लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. यामागे विविध कारणे आहेत. त्यांची जीवनशैली हे त्यापैकी एक मुख्य कारण आहे. आजकाल मुले हातात मोबाईल असल्याशिवाय जेवत नाहीत, नाश्ता करत नाहीत की इतर कामे करत नाहीत. तासनतास मोबाईलवर घालत असल्याने शरीराची हालचाल होत नाही. खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय बुद्धीला चालना देणार्या घरामध्ये खेळता येणार्या खेळांकडेही दुर्लक्ष होत आहे.