कॉटसोवर्ल्डस : आपल्या अवतीभवती अशा बर्याच कन्या, सौंदर्यतारका असतात, ज्यांना आपल्या लूकची सर्वाधिक काळजी असते. काही कन्या अशाही असतात, ज्यांना आपल्या लूकशी काहीही देणेघेणे असत नाही. 20 वर्षीय रिहाना कार्टियर मात्र यापेक्षा खूपच वेगळी असून तिचे वैशिष्ट्य असे की, तिने आपले सारे बालपण जनावरांमध्ये, प्राण्यांमध्ये व्यतित केले आणि त्यानंतर अचानक ती ब्युटी क्वीन म्हणून नावारूपास आली.
ब्युटी क्वीन झालेली रिहाना काही कालावधीपूर्वी अशी अजिबात नव्हती. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, रिहाना पूर्वी छोट्याशा प्राणीसंग्रहालयात रहायची. तिचे बालपण जंगली आणि पाळीव प्राण्यातच व्यतित झाले. एरवी लहान मुलांचे बालपण असे व्यतित होत नाही, पण रिहानाला आवड असल्याने ती इकडे वळली.
रिहानाला प्राण्यांशी मैत्री करण्याचे, त्यांच्याशी हितगुज साधण्याचे गुण तिच्या आईकडून मिळाले. तिची आई 15 वर्षांची असल्यापासून प्राणीसंग्रहालयात रहायची आणि तोच कित्ता रिहानाने देखील गिरवला. रिहानाचेही सारे बालपण प्राणीसंग्रहालयात व्यतित झाले.
कॉटसवोर्ल्डस येथे राहणारी रिहाना प्राणी संग्रहालयात असताना सकाळी 6 वाजता उठून प्राण्यांना अन्न द्यायची. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना तिला हा लळा लागला होता. त्यानंतर अचानक तिने मॉडेलिंगकडे वळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि 16 व्या वर्षी तिने तिकडे मोर्चा वळवला. पुढे तिला मिस इको स्पर्धेत फायनलिस्ट म्हणून संधी मिळाली आणि आता ती युकेमधील मिस अर्थ स्पर्धेत भाग घेत आहे. या स्पर्धेत यश मिळाल्यास मिळालेल्या बक्षीस रकमेचा प्राण्यांसाठी विनियोग करण्याचा तिचा मानस आहे.