नवी दिल्ली : सध्या आपण बरेच पेपर-कप फ्रेंडली झालो आहोत, असे म्हटले तर गैर ठरत नाही. प्लास्टिक कपची जागा आता पेपर कपने घेतली आहे. पण, जितके प्लास्टिक कप घातक असतात, तितकेच पेपर कपही घातक असतात, ही वस्तुस्थिती असून या पार्श्वभूमीवर आपल्या प्रकृतीबाबत अधिक जागरूक होणे काळाची गरज बनते आहे.
प्रा. विपीन व्यास यांच्या मते, पेपर कपचा वापर पूर्ण टाळत चिनी कपचा किंवा कुल्हडचा वापर करणे आवश्यक आहे. पेपर कपचे आधीचे दुष्परिणाम तर आहेतच. त्याशिवाय पर्यावरणाला देखील यामुळे धोका निर्माण होतो. पेपर कप अडकल्यास पाईप ब्लॉक होऊ शकतात आणि त्याचेही अनेक तोटे आहेत. पेपर कप हे प्लास्टिक कपप्रमाणेच टॉक्सिक व नुकसानकारक ठरू शकतात. पेपर कप फॅट रेसिस्टंट असत नाही आणि त्याचप्रमाणे वॉटर रेसिस्टंट देखील असत नाही.
आता फुड पॅकेजिंगसाठी जो कागद वापरला जातो, त्यात सरफेस कोटिंग आवश्यक असते. या कोटिंगमुळे चहा किंवा कॉफी आपल्या हातावर पडत नाही. याचाच अर्थ असा की, हे कोटिंग प्लास्टिकचे असते आणि यामुळे तेथेही थेट प्लास्टिकशी संबंध येतो. कागदाच्या कपमध्ये ज्या प्लास्टिक फिल्मचा वापर होतो, त्याला 'पीएलए' असे म्हटले जाते. ते एक प्रकारचे बायो प्लास्टिकच असते. बायो प्लास्टिक हे कॉर्न, ऊस अशा रिन्युएबल स्रोतांपासून तयार केले जाते. याच्या निर्मितीसाठी फॉसिल फ्युएलचा वापर करावा लागत नाही. 'पीएलए'ला 'बायो डिग्रेडेबल' असे ओळखले जाते. पण, तरीही ते टॉक्सिक होऊ शकते.