Latest

BCCI Annual Contract : बीसीसीआयचा ‘या’ 7 खेळाडूंना दणका, वार्षिक करारातून वगळले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Annual Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2022-23 या वर्षासाठी वार्षिक करार जाहीर केला आहे. करारामध्ये 26 खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी या चार श्रेणींमध्ये स्थान दिले आहे. ए प्लस श्रेणीमध्ये चार खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. जडेजाला या अव्वल श्रेणीत प्रथमच स्थान मिळाले आहे.

बीसीसीआयने 5 खेळाडूंना ए-श्रेणीमध्ये स्थान दिले असून 6 खेळाडूंना बी श्रेणीमध्ये आणि 11 खेळाडूंना सी श्रेणीमध्ये ठेवले आहे. हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना ए श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केएल राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचा बी-ग्रेडमध्ये आणि शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत यांचा सी-ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. (BCCI Annual Contract)

बीसीसीआय वार्षिक करारांतर्गत खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी देत असते. त्यानुसार खेळाडूंचा ए प्लस, ए, बी आणि सी या चार श्रेणींमध्ये समाविष्ट करण्यात येतो. ए प्लस श्रेणी अंतर्गत वार्षिक सात कोटी, ए अंतर्गत पाच कोटी, बी अंतर्गत तीन कोटी आणि सी श्रेणी अंतर्गत 1 कोटी रुपये फी देण्यात येते.

अष्टपैलू जडेजाने यावर्षीच्या करारात सुधारणा करत ए प्लस श्रेणीमध्ये जागा मिळावली आहे. तर दुसरीकडे केएल राहुलची घसरण झाली आहे. मागच्या काही महिन्यांतील त्याचे खराब प्रदर्शन पाहून बीसीसीआयने राहुलला ए श्रेणीतून बी श्रेणीमध्ये जागा दिली. ईशान किशन, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, संजू सॅमसन, केएस भरत आणि आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच बीसीसीआयकडून करारबद्ध केले गेले आहे. पण अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयंक अगरवाल, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा आणि दीपक चाहर यांना मात्र बीसीसीआयच्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. (BCCI Annual Contract)

संजू सॅमसनचा समावेश

गेल्या काही काळापासून भारतीय चाहते युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा टीम इंडियात समावेश करण्याची मागणी करत आहेत. जेव्हा जेव्हा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळतो तेव्हा सोशल मीडियावर संजूचे नाव ट्रेंड करत असते. मात्र, त्याला अद्याप संघात स्थान मिळालेले नाही. पण बीसीसीआयने चाहत्यांना खूशखबर दिली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या यादीत सॅमसनचे नाव प्रथमच समाविष्ट करण्यात आले. त्याला सी श्रेणीचा भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे आता 2022-23 दरम्यान संजूला 1 कोटी रुपये मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT