पुढारी ऑनलाईन डेस्क : ODI World Cup Schedule : भारतात यावर्षी होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 ठिकाणी 48 सामने खेळवले जाणार आहेत. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना 2019 चा चॅम्पियन इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाणार असून प्रत्येक संघ एकूण 9 लिग सामने खेळणार आहे. टॉप-4 संघ बाद फेरीत पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना बुधवार 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी प्रत्येकी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
बीसीसीआयने मंगळवारी पत्रकार परिषद घेत वर्ल्डकप 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. हा कार्यक्रम मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे पार पडला. विश्वचषकादरम्यान, 45 सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये 10 संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. (ODI World Cup Schedule)
भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया आपला शेवटचा साखळी सामना गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर होणार आहे.
टीम इंडिया लीग टप्प्यात एकूण 9 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानांवर होणार आहेत. भारतीय संघ चेन्नई, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, धर्मशाळा, लखनौ, दिल्ली, पुणे आणि बंगळूर येथील मैदानांवर प्रतिस्पर्धी संघांना भीडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर 2011 च्या वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून 28 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान : 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान : 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश : 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड : 22 ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड : 29 ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध क्वालिफायर : 2 नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 5 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर : 11 नोव्हेंबर, बंगळूर
वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकूण 10 शहरांतील मैदानांची निवड करण्यात आली आहेत. यात हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळूर, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत. (ODI World Cup Schedule)
यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सध्या झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या वर्ल्डकप 2023 पात्रता फेरीतून आणखी दोन संघ स्पर्धेत प्रवेश करतील.
पहिला उपांत्य सामना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस असेल. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी कुठल्याही कारणास्तव नाही झाला तर त्यासाठी 20 नोव्हेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील.