छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बांगलादेशातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीची खरेदी करून तिला बुधवारपेठेत वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या आणि तिची छत्रपती संभाजीनगरात विक्री करणाऱ्या आणखी दोन आरोपींना हर्सूल पोलिसांनी २३ जानेवारीला अटक केली. पुण्यातील बुधवारपेठेत घुसून ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी संभाजीनगरातून तिघांना अटक केली होती. आता या प्रकरणातील आरोपींची संख्या पाच झाली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
पीडिता 16 वर्षीय अल्पवयीन तरुणी असून ती बांगलादेशची रहिवासी आहे. ती एका कपड्याच्या दुकानात काम करीत होती. त्यावेळी एका महिलेने तिला भारतात वीस हजार रुपये महिन्याने दुकानात नोकरी लावून देते, असे आमिष दाखवले. एका दलालामार्फत तिला 17 नोव्हेंबर 2023 रोजी बांगलादेश एअर पोर्टजवळ घेऊन गेली. तेथून दुसर्या एका दलालाने पीडितेला भारतीय बॉर्डर पार करून कोलकाता येथे आणले. तेथून एका दलालाने पीडितेला पुण्यात आशा हसन शेख हिच्याकडे आणून सोडले. तिने तिला पाच लाख रुपयांत विकत घेतले. तिला दारू पाजून तिच्याकडून बळजबरी वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यानंतर तिला बुधारपेठेत घेऊन गेली. तिथेही तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. 17 जानेवारी 2024 रोजी तिला बसने छत्रपती संभाजीनगरात आणले व आरोपी समीना सईद शहा हिच्या ताब्यात दिले. त्यांनीही १८ व १९ जानेवारीला तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. मात्र, तिने माघारी जाण्याचा तगादा लावला. यादरम्यान २० जानेवारीला ती रिक्षातून थेट पोलिस आयुक्तालयात गेली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली हाेती.
प्रशांत प्रतुश रॉय (३६, रा. सासवड, पुणे) आणि आशा हसून शेख (४०, रा. नानापेठ, भोईगल्ली, बुधवारपेठ, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या पूर्वी सईद मेहताब शहा ऊर्फ शेख (42), समीना सईद शहा ऊर्फ शेख (34), वाजीद इलियास शेख (37, सर्व रा. कोळेवाडी, राधास्वामी कॉलनी, हर्सूल) यांना अटक केली होती. या सर्व आरोपींना २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे. यातील प्रशांत राॅय हा बंगली मूळव्याध आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचे समोर आले. प्रशांतची पत्नी राणी ही दोन दिवसांपासून पसार झाली आहे.
पोलिस निरीक्षक पोतदार यांनी उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, सुनील चव्हाण, महिला अंमलदार आसिफिया पटेल, अंमलदार शिंदे यांचे पथक पुण्यातील बुधवारपेठ भागात पाठविले. पीडितेला आरोपी राणी, आशा शेख आणि प्रशांत राॅय यांची पूर्ण नावे नव्हती. त्यांचे फोटोही नव्हते. तिला त्यांचा पत्तादेखील व्यवस्थित सांगता येत नव्हता. तरीही हर्सूल ठाण्याच्या पथकाने स्थानिक पोलिस आणि खबऱ्यांच्या मदतीने अशा हसन शेख आणि प्रशांत रॉय यांना शोधून अटक केली. आता फरार राणीचा शोध सुरु आहे.