Latest

कोल्हापूर : बालिंगा दरोड्यातील टोळीच्या म्होरक्याला इंदूरमध्ये बेड्या

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्स या सराफी पेढीवरील सशस्त्र दरोड्यावेळी भरचौकात अंदाधुंद गोळीबार करून बालिंग्यासह पंचक्रोशीत प्रचंड दहशत माजविलेल्या कुख्यात दरोडेखोराला मध्य प्रदेशात इंदूर येथे बेड्या ठोकण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. अंकित ऊर्फ छोटू श्रीनिवास शर्मा (वय 23, रा. पुठ रोड, एमएलडी कॉलनी, अम्बाह, जि. मुरैना, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत तो वाँटेड आहे.

दरोड्यातील 15 तोळे सोन्याचे दागिने, 2 पिस्तूल, 7 काडतुसे, आलिशान मोटार, अँड्रॉईड मोबाईल, वायफाय, सीम कार्ड, डोंगल, मोबाईल, असा सुमारे 16 लाख 22 हजारांचा मुद्देमाल दरोडेखोराकडून हस्तगत करण्यात आला आहे.

जेरबंद केलेल्या दरोडेखोराविरुद्ध मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, नवी दिल्ली आदी राज्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, व्यावसायिकाचे अपहरण करून लूटमार करणे, दरोडे, जबरी चोरी, ठकबाजीसह दोन डझनहून गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. त्याच्या फरार साथीदारांचीही नावे निष्पन्न झाली आहेत, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सांगितले.

संशयित दरोडेखोरांचे मध्य प्रदेशात इंदूर येथे वास्तव्य असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक तातडीने रवाना झाले. 1 सप्टेंबरला सापळा रचून अंकित ऊर्फ छोटू शर्माला ताब्यात घेण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले. दरोडेखोराला अटक करण्यापूर्वी एक दिवस अगोदर याच टोळीने इंदूर येथील सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यात थरारनाट्य…

येथील स्थानिक सराफी व्यावसायिक सतीश ऊर्फ संदीप सखाराम पोहाळकर (रा. न्यू कणेरकरनगर, रिंगरोड, कोल्हापूर), विशाल धनाजी वरेकर (रा. कोपार्डे, ता. करवीर), अंबाजी शिवाजी सुळेकर (रा. पासार्डे, ता. करवीर) यांनी मध्य प्रदेशातील कुख्यात टोळीला हाताशी धरून बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स या सराफी पेढीवरील दरोड्याचा कट रचला होता.

तीन महिन्यांपूर्वी बालिंग्यात भरदिवसा दरोड्याचा थरार

या टोळीने 8 जूनला भरदिवसा कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा घातला. दरोडेखोरांनी सराफी पेढीचे मालक रमेश शंकर माळी व त्यांचे मेव्हणे जितू मोड्याजी माळी (रा. कळंबा, ता. करवीर) यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून 1 कोटी 87 लाखांच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लंपास केली होती.

कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक संशयित सतीश पोहाळकरसह विशाल वरेकर, अंबाजी सुळेकर यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून 22 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. पोहाळकर व अन्य दोन संशयितांच्या चौकशीतून सराफी पेढीवरील दरोड्याचा कट व मध्य प्रदेशातील कुख्यात दरोडेखोर टोळीचा छडा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT