सातारा; पुढारी वृत्तसेवा : जलमंदिर परिसरातील 'बाजीरावची विहीर' या नावाने ओळखल्या जाणार्या पुरातन विहिरीचे छायाचित्र पोस्ट कार्डवर झळकले आहे. केंद्रीय डाकघर विभागाने नुकतेच या पोस्टकार्डचे अनावरण केले. त्यामुळे सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सातारा हे ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून असलेल्या किल्ले अजिंक्यतारावरूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी आणि बाजीराव विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर बांधण्यात आली होती. याच विहिरीचा आता अनोखा गौरव झाला आहे.
भारतीय पोस्ट खात्यातर्फे भारतातील उल्लेखनीय स्टेपवेल्सचे निरिक्षण करुन त्यातील बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, पाय विहीर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळया स्टेपवेलमधून राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ स्टेपवेलच्या छायाचित्रांचा समावेश त्यांच्या पुस्तिकेत केला आहे. त्यामध्ये सातार्यासह नाशिक, अमरावती, पुणे, या जिल्ह्यातील प्रत्येक एका स्टेपवेलचा तर परभणी जिल्ह्यातील चार स्टेपवेल अशा एकूण आठ स्टेपवेलचा समावेश आहे.
सातारची बाजीराव विहिर पोस्ट कार्डवर झळकल्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक आणखी उंचावला. सातारा शहराच्या दृष्टीनेही ही एक अभिमानास्पद बाब आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिध्द होण्याच्या संपूर्ण प्रक्रीयेत महाराष्ट्र बारव संवर्धन समितीचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर, धनंजय अवसरे, हेमंत लंगडे यांनी सहकार्य केले आहे. राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली याच व्यक्तींच्या पुढाकाराने सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची स्वच्छता केली जाते. त्याचप्रमाणे श्री शिवरात्री व श्री शिवजयंतीच्या रात्री विहिरीमधील पायर्या, कमानी व अन्यत्र ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात येत असतो.