पुढारी ऑनलाईन डेस्क : बजाज चेतक (Bajaj Chetak) स्कुटरने भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक व्हेरियंटसह पुनरागमन केले आहे. मात्र त्या आधी 70, 80 आणि 90 च्या दशकात या पेट्रोलवर चालणा-या बजाज चेतक स्कूटरने बाजारात तसेच लोकांच्या हृदयावर राज्य केले. पण 2000 नंतर नव्या युगातील स्कूटर्सच्या शर्यतीत ती मागे पडू लागली. 2005 मध्ये कंपनीने चेतकचे उत्पादन बंद केले. मात्र, 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेरियंटसह चेतक पुन्हा ग्राहकांच्या भेटीला आली. चला तर मग चेतक स्कुटरच्या इतिहास एक नजर टाकूया.
बजाज ऑटोने 1972 मध्ये भारतीय रस्त्यावर चेतक स्कुटर उतरवली. त्याची रचना व्हेस्पा स्प्रिंट आणि नाव महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्यावरून घेण्यात आले. 1972 मध्ये चेतकच्या 1000 युनिट्सचा लॉट बाजारात आला आणि त्याची किंमत 8 ते 10 हजार रुपये दरम्यान होती. लाँच झाल्यानंतर, ही स्कुटर भारतीय बाजारपेठेत सुपरहिट ठरली. त्याची मागणी वाढतच गेली. वाढत्या लोकप्रियतेमुळे कंपनीने याला 'हमारा बजाज'ची टॅग लाइन दिली. यापूर्वी त्याच्या डिलिव्हरीसाठी 3 महिने वाट पाहावी लागत होती. त्याच वेळी, काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, एक वेळ अशी होती की चेतक (Bajaj Chetak) स्कुटरच्या डिलिव्हरीसाठी 20 महिने प्रतीक्षा करावी लागली.
1977 मध्ये, कंपनीने पहिल्यांदा चेतकच्या (Bajaj Chetak) 1 लाख युनिट्सची विक्री केली. तर, 1986 मध्ये हा आकडा 8 लाखांवर पोहोचला. चेतकच्या यशाचा हा नवा विक्रम होता. 90 च्या दशकातही या स्कुतरची मागणी कमी झाली नाही. कंपनीने या कालावधीत सलग अनेक महिने 1 लाख युनिट्सची विक्री केली. 2002 मध्ये चेतकची किंमत सुमारे 27 हजार रुपये होती, जी 2005 पर्यंत जवळपास 31 हजारांवर पोहोचली. चेतकच्या वाढत्या किमतींचा त्याच्या विक्रीवर परिणाम होऊ लागला. दुसरीकडे, बाजारात अॅक्टिव्हाची या नव्या दूचाकीची पकड मजबूत होत गेली. अखेरीस चेतक या शर्यतीत मागे पडली आणि 2005 मध्ये कंपनीने या स्कुटरचे उत्पादन बंद केले.
14 वर्षांनंतर म्हणजेच 2019 मध्ये बजाज ऑटो लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष राहुल बजाज यांनी चेतकची निर्मिती नव्या रुपात करण्याची घोषणा केली. यावेळी स्टायलिश आणि नवीन पिढीच्या गरजेनुसार स्कुटरची निर्मितीचे ध्येय ठेवण्यात आले. आता चेतक पुन्हा एकदा नव्या अवतारात आणि इलेक्ट्रीक स्वरुपात भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे.