पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक निवडणुकीवरून हे लक्षात आलेले आहे, की जनमाणसांमध्ये भाजपाची प्रतिमा आता खराब झाली आहे. यापुढे मतदार भाजपला मतदान करणार नाहीत. सुरुवात कर्नाटकपासून झाली आहे. संपूर्ण देशात असा एकही पक्ष नाही की, जो संपूर्ण देशात लढेल. म्हणून त्या-त्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आघाडी करून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यामध्ये डेमॉक्रोटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाअधिवेशन सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या राज्यातील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक पक्षांचा प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठक आयोजित करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बैठक निश्चित झाली की घटक पक्षांचे नेते त्यासाठी उपस्थित राहतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिले असून, सोहळ्यासाठी कर्नाटक येथे जाणार आहेत.
'उद्याचं भविष्य सांगणारी खरी माणसं नसतात. शिक्षणाच्या मार्गात अडथळा आणतात. चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणारी असतात. असे होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी एकसंघ होऊन प्रतिगामी शक्तींचा सामना आणि संघर्ष करावा लागेल,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. डेमॉक्रोटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाअधिवेशन शुक्रवारी (दि. 19) पुण्यात आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. डेमॉक्रोटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, माजी आमदार, साहित्यिक लक्ष्मण माने, स्वागताध्यक्ष अजिंक्य चांदणे आदी उपस्थित होते.
माने म्हणाले, 'उपेक्षित समाजातील युवकांची लढायची तयारी आहे. मात्र, कोणाबरोबर ते माहिती नाही. त्यासाठी पवार यांचे हात बळकट करावे लागतील.' 'आरक्षणाच्या फायद्यासाठी वर्गवारी करावी लागेल. आरक्षणाला विरोध करणारे सरकार केंद्रात आहे,' असे प्रा. सुकुमार कांबळे यांनी सांगितले, तर 'सत्तेचा मार्ग उपेक्षितांसाठी उद्धाराचा ठरणार आहे,' असे अजिंक्य चांदणे यांनी स्पष्ट केले.