Latest

जनआरोग्य योजना भारी… लाभ मिळतोय घरोघरी

Arun Patil

कोल्हापूर : आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवून नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात आले आहे. यापूर्वी उपचारासाठी रेशन कार्डधारक कुटुंबीयांना दीड लाख रुपये दिले जात होते. आयुष्मान भारत योजना सुरू झाल्यापासून साडेतीन लाख असे एकूण पाच लाख रुपये एका कुटुबांच्या आरोग्यावर प्रत्येक वर्षी शासन खर्च करत आहे. योजनेतून पाच लाखांपर्यंत 1209 आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 2013 ते 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत 1 लाख 75 हजार 540 कुटुंबांना याचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे रुग्णाचे आरोग्य सद़ृढ होण्यास मदत झाली आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना यापूर्वी उत्पन्नाची मर्यादा असलेल्यांनाच लागू होती. त्यामुळे इतर कागदपत्रांसह उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासत होती. सुधारित योजनेमध्ये सर्वच कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचारांचा खर्च दिला जात आहे. सन 2011 मध्ये जिल्ह्यात जनआरोग्य योजनेचा लाभ अवघ्या 5 लाख कुटुंबांना होत होता. जुलै 2023 पासून सर्वांसाठी जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. याचा जिल्ह्यातील 24 लाख 50 हजार कुटुंबांना फायदा होत आहे. त्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत. 56 खासगी आणि सरकारी 90 रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पांढर्‍या रेशन कार्डधारकांचा समावेश नाही.

योजनेअंतर्गत या सुविधांचा लाभ

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये नागरिकांना एक रुपयाही रोख भरावा लागत नाही. कारण आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे.

लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड, शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT