वाराणसी; वृत्तसंस्था : राम मंदिर तीर्थ ट्रस्टचे एक विश्वस्त तसेच आंबेडकरनगरचे रहिवासी डॉ. अनिल मिश्रा हे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानांचे सपत्नीक यजमान असतील. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या सोहळ्याचे मुख्य यजमान आहेत, असे सांगण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे मुख्य यजमान असले तरी ही बाब केवळ प्रतीकात्मक आहे. प्रत्यक्षात यजमान म्हणून सारी अनुष्ठाने डॉ. मिश्रा पार पाडतील. त्यामागचे कारण म्हणजे अनुष्ठानात प्रत्यक्ष यजमान व्हायचे, तर त्यासाठी गृहस्थ असणे आवश्यक असते.
प्राणप्रतिष्ठेसाठी शुभमुहूर्त ठरवणारे पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानांचे मुख्य पौराहित्य करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी, पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्ष विधींमध्ये मुख्य यजमान नाहीत, अशी माहिती दिली. डॉ. अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी यजमान आहेत. संकल्प, प्रायश्चित्त आणि गणेशपूजा आदी माध्यमांतून 7 दिवस चालणार्या अनुष्ठानांत हे दाम्पत्यच यजमान म्हणून सहभागी असेल. पंतप्रधान मोदी हे प्रतीकात्मक मुख्य यजमान आहेत. प्रत्यक्ष विधींत मात्र डॉ. मिश्रा यांचा सपत्नीक सहभाग असेल.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा विधी अयोध्येत मंगळवारी दुपारी 1.15 पासून सुरू झाला. प्रायश्चित्त, शरयू नदीत दश विधान, सौर, पूर्वोत्तरंग, गोदान, पंचगव्यप्राशन, दशदान आणि कर्मकुटी होम हे विधी पार पाडण्यात आले. प्रायश्चित्त पूजा सकाळी 9.30 वाजता सुरू झाली, ती पुढे 5 तास चालली.
दि. 16 ते 21 जानेवारी या 6 दिवसांच्या पूजेत डॉ. मिश्रा हे पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधी म्हणून विधीत सपत्नीक सहभागी आहेत व असतील. अनुष्ठानांत सातव्या दिवशी पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. प्रभू रामाला ते नैवेद्य दाखवतील आणि आरतीही करतील. पंतप्रधान मोदी हे 22 जानेवारी रोजी गर्भगृहात हाताने कुशा आणि शलाका ओढतील. त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. याउपर यजमानांसाठी आवश्यक असलेले सात्त्विक जीवनाचे सर्व नियम पंतप्रधान मोदी यांना पाळावे लागतील आणि ते पाळत आहेत.
काशी आणि देशभरातील 121 वैदिक ब्राह्मण अनुष्ठानांत सहभागी झाले आहेत. यात मुहूर्तकार पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड, मुख्य आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित, पं. अनुपम दीक्षित, पं. अरुण दीक्षित, पं. सुनील दीक्षित, पं. गजानंद जोगकर आणि घाटे गुरुजी यांचा समावेश आहे.