Latest

Ayodhya Ram Mandir Inauguration : चर्चेतील चेहरा : अरुण योगीराज

Shambhuraj Pachindre

सर्वम खल्विदं ब्रह्म अशी उपनिषदवाणी आहे. एकमेवाद्वितीय परमचैतन्य, परमात्माच सर्व चराचराला व्यापून राहिलेला आहे. अंतर्बाह्य, सर्वत्र व्यापलेल्या या आत्मतत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तशीच साधना, तपश्चर्याही लागते. मात्र कृपासिंधू भगवंताने अनेक नाम-रूपात अवतरून भक्तांना दर्शन देण्याची कृपाही युगायुगांमध्ये केलेली आहे. या अवतारांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्यही काही सिद्धपुरुषांनाच लाभत असते. मात्र सर्व भाविकांना त्यांचे दर्शन वेगवेगळ्या मूर्तींमधून सुलभरीत्या होत असते. षडैश्वर्यपूर्ण भगवंताचे हे नयनरम्य रूप डोळे भरून पाहण्यासाठी, साधना-भक्ती करण्यासाठी मूर्ती घडवली जाते. माती, पाषाण, धातू, रत्ने अशा अनेक माध्यमातून मूर्ती घडवल्या जातात. शास्त्रांमध्ये त्याबाबतची विविध प्रकारची माहिती वाचण्यास मिळते. अशा मूर्ती घडवणारे कुशल मूर्तिकार, शिल्पकार आजही आपल्या देशात आहेत. त्यामधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे अरुण योगीराज. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर उभ्या राहिलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे, ती घडवण्याचे भाग्य याच मूर्तिकाराला लाभले आहे! (Ayodhya Ram Mandir Inauguration)

अरुण योगीराज हे अवघे चाळीस वर्षांचे आहेत. त्यांच्या कुटुंबात पिढ्यान्पिढ्या मूर्ती घडवण्याचे काम केले जाते. कर्नाटकातील म्हैसूर येथील हे कुटुंब वडियार राजघराण्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. स्वतः अरुण योगीराज यांनी देशातील अनेक प्रसिद्ध मूर्ती, पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये राजधानी दिल्लीतील इंडिया गेटजवळील अमर जवान ज्योतीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याचा तसेच केदारनाथ येथील आद्य शंकराचार्यांच्या भव्य मूर्तीचाही समावेश आहे. या शिल्पकाराच्या हस्तस्पर्शाने निर्जीव पाषाणही जणू काही जिवंत होतो.

त्यामध्ये चैतन्य जाणवू लागते! सात महिन्यांपूर्वी त्यांनी रामलल्लाच्या मूर्तीचे काम सुरू केले होते. काळ्या पाषाणातील ही मूर्ती घडवण्यापूर्वी त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. पाच वर्षांच्या कोमल बालकाच्या रूपातील ही मूर्ती घडवत असताना त्यामधील सूक्ष्म तपशील, चेहर्‍यावरील भाव, शरीराची ठेवण लक्षात घेऊन त्यांनी हे काम सुरू केले. या कामाचा ध्यास घेतल्याने त्यांनी अनेक रात्री जागून काढल्या आहेत. मूर्ती घडवत असताना एकदा दगडाचा एक छोटासा, अणुकूचीदार तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला होता व ऑपरेशन करून तो काढावा लागला होता. डोळ्याचे हे दुखणे असतानाही त्यांनी तितक्याच तन्मयतेने हे 'रामकाज' केले. आता त्यांची ही आजपर्यंतची शिल्पसाधना भगवान श्रीरामचंद्रांनी फलद्रुप केली आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguratio

योगीराज यांच्यासह अन्य दोन शिल्पकारांनीही रामल्लाची मूर्ती घडवली आहे. सत्यनारायण पांडे यांनी संगमरवरापासून घडवलेली एक मूर्ती होती. तर गणेश भट्ट आणि अरुण योगीराज या शिल्पकारांनी काळ्या पाषाणातून तयार केलेल्या दोन मूर्ती होत्या. मात्र मुख्य गाभार्‍यात प्रतिष्ठापित करण्यासाठी योगीराज यांच्या मूर्तीचीच तज्ज्ञांनी निवड केली. अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती 51 इंच उंचीची आहे. या मूर्तीचे वजन 200 किलो आहे. यानिमित्ताने योगीराज यांनी हा एक नवा इतिहासच घडवला आहे!

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT