Latest

‘ऑडिओलॉजिस्ट’ उत्तम करिअरचे नवे दालन

Arun Patil

आपल्याकडे ऑडिओलॉजिस्ट तज्ज्ञांची बरीच कमतरता दिसून येते. या पार्श्वभूमीवर ऑडिओलॉजीमध्ये स्पेशलाईज्ड कोर्स करणे हे सध्या करिअरचे नवे दालन ठरले आहे.

स्पीच ऑडिओलॉजी म्हणजे काय? :

हे आरोग्य सेवेशी संलग्न क्षेत्र आहे. ऑडिओलॉजिस्ट हे व्यावसायिक फिजिशियन नसून स्पीच लँग्वेज किंवा हिअरिंग एक्सपर्ट असतात. स्पीच, व्हॉईस किंवा लँग्वेज डिसऑर्डरने ग्रस्त असणार्‍या मुलांना किंवा वयस्क लोकांचे पुर्नवसन करणे हे त्यांचे काम असते. हे तज्ज्ञ ऑडिओमीटर्स, संगणक आणि इतर तपासणी उपकरणांच्या मदतीने रुग्णांमधील श्रवणासंबंधीच्या आणि असंतुलनासंंबंधीच्या समस्याबाबत सखोल माहिती घेऊन रुग्णावर कोणते उपचार करायचे हे ठरवतात.

ऑडिओलॉजिस्ट म्हणून काम करताना वेगवेगळ्या वयाच्या, संस्कृतीच्या आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत काम करावे लागते. त्यासाठी प्रभावी इंटरपर्सनल स्किल्स, वैज्ञानिक द़ृष्टिकोन त्याचसोबत संयम असणे गरजेचे असते. तांत्रिकद़ृष्ट्या नवीन माहिती असणे देखील गरजेचे असते. कारण सध्याच्या काळात श्रवणासंबंधी समस्येसाठी हिअरिंग एड्स, कोकलियर इम्प्लॉटस, लिसनिंग डिव्हाईस यांसारखी बरीच अद्ययावत उपकरणे बाजारात आलेली आहेत. या उपकरणांची मदत या व्यवसायात घेता येते. या व्यतिरिक्त नेतृत्व गुण आणि व्यवस्थापन कौशल्य देखील सातत्याने वाढविणे गरजेचे ठरते.

स्पीच ऑडिओलॉजिस्ट बनण्यासाठी स्पीच अँड हिअरिंग सायन्समधील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात डिप्लोमा कोर्स करूनही प्रवेश करता येतो. ऑडिओलॉजी अँड स्पीच, हिअरिंग लँग्वेज अँड स्पीच, ऑडिओलॉजी अँड स्पीच रिहॅबिलीटेशन, स्पीच लँग्वेज अँड हिअरिंग सायन्स किंवा बॅचलर इन स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी कोर्स करणे योग्य ठरू शकते. भारतात जवळपास 20 विद्यापीठांमध्ये स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओशी संबंधित अभ्यासक्रम राबविले जातात. हे अभ्यासक्रम रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहेत. गुणवत्तेच्या आधार विद्यार्थ्यांना इथे अनेक संस्थामध्ये प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.

ऑडिओलॉजिस्ट हे फिजिशिअन्स, मानसोपचार तज्ज्ञ किंवा सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काम करतात. शाळा, हॉस्पिटल्स, पुनर्वसन केंद्र, अ‍ॅडल्ट केअर सेंटर, रिसर्च लॅबरोटरी, नर्सिंग केअर फॅसिलिटीज् इत्यादी ठिकाणी इच्छा असल्यास सेवा देता येऊ शकते. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण कार्याशी जोडण्याव्यतिरिक्त साईन लँग्वेज एंटरप्रिटर, लँग्वेज स्पेशालिस्ट, लिंग्विस्ट या पातळ्यांवर काम करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत. परदेशात देखील ऑडिओलॉजिस्टशी संबंधित बरेच चांगले पर्याय उपलब्ध आहेत. एका आकडेवारीनुसार भारतात जवळपास 8 टक्के लोकांना बोलण्याशी संबंधित तर 19 लोकांना ऐकण्याशी संबंधित समस्या आहेत. पदवीधर ऑडिओलॉजिस्टला सुरुवातीला 18 ते 20 हजार रुपये प्रतिमहिना मिळतात; तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा पीएचडी करणार्‍यांना यापेक्षा दुप्पट वेतन मिळते.

अभ्यासक्रम राबविणार्‍या भारतातील महत्त्वाच्या संस्था ः सुंदरलाल जैन हॉस्पिटल, दिल्ली.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग, म्हैसूर.
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हिअरिंग हँडीकॅप्ड, मुंबई.
श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई.
पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स, चंदीगढ.
मनिपाल अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मनीपाल.

सुचित्रा दिवाकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT