भंडारा; पुढारी वृत्तसेवा : वन विभागाच्या हद्दीत रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकाला (forest ranger) ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत वडेगाव रिठी येथे घडला. जयश्री महादेव राजगिरे (रा. भंडारा) असे महिला वनरक्षकाचे नाव आहे.
जयश्री राजगिरे ह्या वडेगाव रिठी येथे गस्तीवर असताना वन विभागाच्या हद्दीतील वैनगंगा नदीच्या काठावर दोन व्यक्ती रेतीचे उत्खनन करुन ट्रॅक्टरमध्ये चोरुन नेत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टरने राजगिरे यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्का देऊन बाजूला करीत दोन्ही व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. (forest ranger)
याप्रकरणी जयश्री राजगिरे यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी शैलेश शालीक निंबार्ते (३२) व मंगेश शालीक निंबार्ते (३५) रा. मंडनगाव या दोन भावांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिसाळे करीत आहेत.