वेल्हे (पुणे), पुढारी वृत्तसेवा: सिंहगड भागात दोन ग्रामसेवकांवर समाजकंटकांनी हल्ला केला. एकाला ग्रामपंचायत कायार्लयातच मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी उत्तमनगर व हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
खामगाव मावळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. २७) सकाळी ग्रामसेवक लक्ष्मण भगवान शिंगाडे (रा. पुणे) यांना आनंद भरत थोपटे (वय २४, रा. मणेरवाडी) व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी बेदम मारहाण केली. तर कुडजे (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेशकुमार नानासाहेब खाडे (वय ३९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांचे अपहरण करून विषारी औषध पाजण्याची धमकी देत ७३ हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी विकास प्रकाश गायकवाड (वय ३८,रा. कुडजे) व इतर दोघांवर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २६) रात्री कुडजे येथील एका हॉटेलमध्ये घडला.
कुडजे येथील कामकाज आटोपून ग्रामसेवक खाडे हे सायंकाळी मोटारीतून घरी चालले होते. त्यावेळी विकास गायकवाड व इतर दोघांनी त्यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांचे अपहरण केले. गायकवाड याने खाडे यांच्याकडून फोन पेद्वारे ७३ हजार रुपयांची खंडणी वसूल केली.या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार यांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे.
दुसऱ्या घटनेत आनंद थोपटे याने खामगाव मावळ ग्रामपंचायत कायार्लयात जाऊन ग्रामसेवक शिंगाडे यांना कागदपत्रांबाबत जाब विचारत बेदम मारहाण केली. या प्रकरणी थोपटे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हवेलीचे ठाणे अंमलदार निलेश राणे यांनी सांगितले. दरम्यान, पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ व पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामसेवकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली