बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वातावरण गेल्या काही महिन्यांपासून विविध जातींच्या आरक्षणावरून ढवळून निघाले आहे. त्याचे परिणाम आता गावोगावी दिसू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकोप्याने राहणार्या गावगाड्यातील समाजात आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्त धुसफूस सुरू आहे. त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ लागली असून सोशल मीडियावर एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे. 2023 च्या अखेरीस सर्वत्र आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरक्षण मिळालेला आणि न मिळालेला समाज अशी सरळसरळ दुफळी निर्माण झालेली आहे. ओबीसी प्रवर्गाने अधिकचे आरक्षण घेतले असून त्यांच्यातूनच आम्हाला वाटा हवा, तो आमचा हक्क असल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी ओबीसी नेत्यांची व समाजाची मागणी आहे.
संबंधित बातम्या :
या दोन प्रमुख वर्गासह अन्य वर्गाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे. धनगर समाजाची एस. टी. प्रवर्गाचे आरक्षणाची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. या मागणीसाठीही आंदोलने सुरू आहेत. याशिवाय छोट्या-मोठ्या अन्य समाजाकडूनही आरक्षण या विषयावर सध्या वातावरण तापवत सरकारला धारेवर धरले जात आहे. आरक्षणाच्या या गुंत्यामुळे समाजात असलेला एकोपा आता धोक्यात येऊ लागला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी सोडली जात आहे. एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. ही दुफळी समाजाला परवडणारी नाही. परंतु सध्या नेतेमंडळींकडूनच आरक्षणाच्या विषयातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात आहे, त्यामुळे याला खतपाणी घालण्याचे कामही काही नेतेमंडळीच करत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळत आहे. समाजात याविषयी उघडपणे कोणी बोलत नसले तरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे. सामाजिक एकोप्यासाठी ती धोकादायक ठरते आहे.