पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : रांजणी येथे गुरुवारी (दि. २६) तीन ठिकाणी ऊसतोडीची कामे बिबट्यांनी थांबवली. तीनही ठिकाणी बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने ऊसतोड कामगारांनी ऊस तोडणीचे काम थांबवले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व संबंधित शेतकरी व कामगारांना सावधगिरीचे उपाय सांगितले. रांजणी गावाच्या पश्चिमेला असलेल्या जाधव मळा येथील लक्ष्मण सखाराम जाधव यांच्या दोन ठिकाणी असलेल्या शेतांमध्ये गेली सहा दिवसापासून ऊसतोड सुरू आहे. गुरुवारी (दि. २६) सकाळी ऊस तोडणीला सुरुवात झाल्यानंतर उसाच्या शेतातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला.
त्यामुळे ऊसतोड कामगारांनी ऊस तोडणीचे काम त्वरित थांबवले. त्यानंतर रांजणी गावातील चौकोनी मळा येथिल बाळासाहेब भिकाजी वाघ यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी सुरू असताना तेथे देखील बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज अनेक वेळा आला. ऊसतोड कामगारांनी पाहणी केली तर उसाच्या शेताच्या कडेलाच बिबट्याने एक कुत्रे आणले होते. कुत्र्याला ठार मारून त्याचा काही भाग फस्त केलेला होता. येथील शेतकरी दत्तात्रय महादू वाघ यांच्या घरासमोरून पहाटे चार वाजता कुत्र्याला बिबट्याने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान बुधवारी (दि. २५) सकाळी रांजणी ते मंचर रस्त्यावर पंढरीनाथ शंकर जाधव यांच्या शेतात उसतोड सुरु झाल्यानंतर बिबट्याच्या गुरगुरण्याच्या आवाज आल्याने उसतोड थांबवावी लागली. लक्ष्मण वाघ व बाळासाहेब भिकाजी वाघ यांनी या घटनेची माहिती वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे यांना दिली. कासारे यांनी वनकर्मचाऱ्यांसमवेत पाहणी केली.उसतोड सुरू असलेल्या शेतांमध्ये उसतोडणी बंद ठेवण्याच्या सूचना कासारे यांनी दिल्या आहेत.
सध्या सर्वत्र ऊस तोडणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे बिबट्यांचा अधिवास संपत आला आहे. बिबट्यांना लपण जागा राहिलेली नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी ऊस तोडणी करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. ऊस तोडणी करताना शक्यतो दिवस उजाडल्यानंतरच सुरुवात करावी. सोबत लहान मुलांना न्यायला टाळावे. शेतकऱ्यांनी देखील शेतांमध्ये सायंकाळच्या वेळी फटाके फोडावेत. यामुळे बिबट्या तेथून दूर जाईल.
– प्रदिप कासारे, वनपरिमंडळ अधिकारी, वळती वनविभाग