पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : नेमबाजीतील भारताची उत्कृष्ट कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धेतही कायम आहे. नेमबाजीत भारताने आणखी एक पदक जिंकले आहे. पुरुषांच्या ट्रॅप वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत कीनन चेनईने कांस्यपदक पटकावले आहे. कीनन 40 पैकी 32 शॉट्स मारण्यात यशस्वी ठरला. कुवेतच्या तलाल अलराशिदीने रौप्य आणि चीनच्या क्यू यिंगने सुवर्णपदक जिंकले.
रविवारी (1 ऑक्टोबर) स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवण्यात यश आले. दिवसाच्या सुरुवातीला पुरुष ट्रॅप संघाने सुवर्णपदकावर निशाणा साधला. तर महिला ट्रॅप संघाने रौप्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर दुपारी पुरुषांच्या ट्रॅप वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत कीनन चेनईने कांस्यपदक जिंकले. चालू स्पर्धेच्या भारताचे हे नेमबाजीतील 22 पदक ठरले आहे. यात सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.