पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोळला काल शनिवारी पार पडला. त्यानंतर आज (24 सप्टेंबर) स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच भारताने धमाकेदार सुरुवात करत 5 पदकांची कमाई केली आहे. भारताचे पदकाचे खाते उघडले असले तरी सुवर्ण पदकाने अद्याप हुलकावणी दिली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. रोइंग संघाने 2 रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले, तर एअर रायफल संघाने एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.
रमिताने देशाला नेमबाजीत पाचवे पदक मिळवून दिले. रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले. यापूर्वी तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. आशी चोक्सी आणि मेहुली घोष त्या टीमचा भाग होत्या. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल्समध्ये चीनने सुवर्णपदक आणि रौप्य पदकावर मोहोर उमटवली.
10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
पुरुष कॉक्सड ८ संघ (रोइंग): रौप्य
महिला १० मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य
भारताच्या पुरुष हॉकी संघाने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने उझबेकिस्तान संघाचा 16-0 असा पराभव केला. या सामन्यात भारतासाठी तीन खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली.