Latest

Asian Games Badminton : बँडमिंटनमध्ये भारतीय संघाला ‘रौप्यपदक’! सुवर्णपदक थोडक्यात हुकले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Badminton : आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला चीनच्या संघाकडून 3-2 ने पराभव पत्करावा लागला. याचबरोबर भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गोल्ड मेडल सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. दुखापतीमुळे अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. पण भारतीय संघाने न डगमगता यजमान चीनी संघाला कडवी झुंज दिली. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, सात्विकसाईराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन यांनी संघर्षमय खेळाचे प्रदर्शन केले.

लक्ष्य सेनने भारताला मिळवून दिली आघाडी

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेन आणि शी यु आमनेसामने आले होते. ज्यात लक्ष्य सेनने बाजी मारली आणि भारतीय संघाला या सुवर्ण पदकाच्या लढतीत 1-0 ने आघाडी मिळवून दिली. लक्ष्य आणि शी यु यांच्यात पहिल्या गेममध्ये चुरस पहायला मिळाली. लक्ष्यने पहिला गेम 22-20 असा जिंकला. यानंतर शी युचीने जबरदस्त पुनरागमन केले. ज्यामुळे भारतीय खेळाडू बॅकफुटवर गेला. शी यु ने हा गेम 21-14 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही चीनी खेळाडूने लक्ष्यवर दबाव टाकत मोठी आघाडी मिळवली. लक्ष्य एका वेळी 13-9 असा पिछाडीवर होता. यानंतर भारतीय खेळाडूने झुंझार खेळ करत गुणसंख्या 16-16 अशी बरोबरीत आणली. यानंतर लक्ष्यने शी युला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि हा गेम 21-18 ने जिंकला. याचबरोबर त्याने हा सामना जिंकला.

चिराग-सात्विकचा सहज विजय

दुसऱ्या सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांचा सामना पुरुष दुहेरीत योंग डुओ लियांग आणि वेंग चेंग यांच्याशी झाला. चिराग-सात्विकने पहिला गेम 21-15 असा सहज जिंकला. या सामन्यात भारतीय जोडीने वर्चस्व राखले आणि चीनच्या जोडीला गुण मिळू दिले नाहीत. यानंतर चिराग-सात्विकने दुसरा गेमही 21-18 असा जिंकला. अशा प्रकारे या दोघांनी भारताला चीनवर 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

चीनचे पुनरागमन, भारताचे सलग दोन पराभव

तिसऱ्या सामन्यात भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना एकेरीत शिफेंग लीशी झाला. शिफेंगने पहिल्या गेममध्ये श्रीकांतचा 24-22 असा पराभव केला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये शिफेंगने श्रीकांतला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि 21-9 असा विजय मिळवून चीनचे स्पर्धेतील आव्हान राखले. शिफेंगच्या विजयानंतर ही आघाडी 2-1 अशी झाली. त्यानंतर चौथ्या सामन्यातही चीनने वर्चस्व कायम राखले. त्यांच्या लिऊ युचेन आणि औ झुआनी यांनी ध्रुव कपिल आणि साई प्रतीक या जोडीवर विजय मिळवून 2-2 अशी बरोबरी साधली. भारतीय जोडीला 21-6, 21-15 असा पराभव पत्करावा लागला. याचबरोबर चीनने तिसरा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावले.

चीनने सलग तिसरा सामना जिंकला

पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारतीयांची नजर मिथुन मंजूनाथ याच्यावर होती. पण या एकेरी सामन्यात वेंग होंगयांगने सलग दोन गेममध्ये सहज मिळवला. वेंगने पहिला गेम 21-12 आणि दुसरा गेम 21-4 ने जिंकला. याचबरोबर चीनने सलग तिसरा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावले आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत कधीही सुवर्णपदक जिंकलेले नाही. या स्पर्धेत भारताने 1974, 1982 आणि 1986 मध्ये केवळ कांस्यपेक्षा पदक जिंकले आहे. भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकल्यास 61 वर्षात प्रथमच संघ सुवर्णपदकावर नाव कोरण्यात यशस्वी होईल. पुरुष बॅडमिंटन सांघिक स्पर्धा 1962 पासून आशियाई खेळांमध्ये खेळली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT