पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Asia Cup : आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. हा महामुकाबला श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे मैदानात उतरले. पाकिस्तानकडून पहिले षटक शाहिन आफ्रिदीने फेकले. यानंतर सलग 4.2 षटकांपर्यंत खेळ झाला आणि त्यानंतर पावसाने हजेरी लावली. परिणामी खेळ थांबवण्यात आला. दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाने व्यत्यय आणल्याने पुढे कसे होणार अशी चिंता चाहत्यांना लागली आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया हा सामना पावसात वाहून गेला तर सामन्याचा निकाल काय लागेल?
वास्तविक, राजकीय मुद्द्यांमुळे भारत विरुद्ध पाकिस्तान द्विपक्षीय मालिका बऱ्याच दिवसांपासून होत नाही. अशा परिस्थितीत हे दोन्ही संघ केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. शेवटच्या वेळी या दोन संघांचा सामना टी-20 विश्वचषक 2022 मध्ये झाला होता, जिथे टीम इंडियाने विराट कोहलीच्या संस्मरणीय खेळीच्या जोरावर विजय मिळवला होता. आता तब्बल 10 महिन्यांनंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे, मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे चाहते नाराज झाले. वास्तविक, काही वेळाने पाऊस थांबला आणि खेळ पुन्हा सुरू झाला. पण 5 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहिन आफ्रिदीने रोहित शर्माचा त्रिफळा उडवून टीम इंडियाला मोठा झटका दिला. (IND vs PAK Asia Cup)
AccuWeather ने दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तर 2 वाजता हवामान चांगले होऊ शकते असे म्हटले होते. त्यानंतर 3 वाजल्यापासून पुन्हा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. झालेही तसेच सामन्याला तीन वाजता सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला. त्यामुळे खेळ थांबवून खेळपट्टी झाकण्यात आली. दुपारी 4 ते 6 या वेळेत ढगाळ वातावरण असेल, मात्र पावसाचा अंदाज नाही. सायंकाळी 7 वाजता पुन्हा पावसाचा अंदाज आहे. AccuWeather कडील हवामान अहवाल पाहिल्यानंतर चाहते आणि खेळाडू दोघेही निराश होऊ शकतात.
अशा परिस्थितीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे वाहून गेला तर काय होईल? या प्रश्नाच्या उत्तरची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायदा होणार आहे. पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधील पहिला सामना नेपाळविरुद्ध जिंकला आहे. त्या सामन्यात 238 धावांनी दणदणीत विजय नोंदवल्यानंतर त्यांच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. जर भारताविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला, तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातील. यामुळे पाकचे एकूण गुण 3 होतील, अशा परिस्थितीत ते थेट सुपर-4 साठी पात्र ठरतील.
पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला तर टीम इंडियाच्या खात्यात 1 गुण जमा होईल. अशा स्थितीत पुढील सामन्यात नेपाळविरुद्ध विजयाची नोंद करून भारत सुपर-4साठी सहज पात्र ठरू शकतो. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत जर नेपाळने भारताला पराभूत केले तर टीम इंडिया ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडेल आणि नेपाळ सुपर-4 साठी पात्र होईल.
दुसरीकडे, भारताचा नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे वाहून गेला, तर दोन्ही संघांमध्ये 1-1 गुणांची विभागणी होईल आणि या स्थितीत टीम इंडिया 2 गुणांसह सुपर-4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे फक्त 1 गुण असेल, आणि हा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
सामन्यात पाऊस पडला तर निकालासाठी दोन्ही संघांना किमान 20 षटके खेळणे आवश्यक आहे. जर फक्त सामन्याच्या पहिल्या डावात पाऊस पडला आणि तो थांबलाच नाही तर संपूर्ण सामना वाहून जाईल. दुसऱ्या डावाच्या 20 षटकांनंतर पाऊस पडल्यास, डकवर्थ-लुईस नियम लागू होईल. त्यामुळे सामन्याचा निकाल लागण्यास मदत होईल.
समजा भारतीय संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 300 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर पाकिस्तानी संघाने 15 षटकांत 100 धावा केल्या आणि पावसाने व्यत्यय आणला आणि जर दिवसभर पाऊस थांबला नाही तर सामना रद्द होईल. एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू करण्यासाठी 20 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे. जर पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात 20 षटके खेळली आणि नंतर पाऊस आला आणि थांबला नाही, तर डकवर्थ-लुईस पद्धत लागू केली जाईल आणि विजेता निवडला जाईल.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 15 षटकांनंतर पाऊस पडला आणि सामना रद्द करण्यासाठी नियोजित वेळेपूर्वी सामना थांबवला, तर 15 षटकांनंतर खेळ सुरू होईल, परंतु डकवर्थ-लुईस नियमानुसार, पावसानंतर उरलेल्या वेळेत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला पंचांकडून नवीन लक्ष्य दिले जाते. उरलेल्या विकेट्स आणि उरलेल्या षटकांचा विचार करून लक्ष्य दिले जाते. तथापि, चाहत्यांना आशा असेल की पूर्ण सामना होईल आणि त्यांना महामुकाबल्याचा आनंद घेता येईल.