पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Playing 11 : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचा कर्णधार तर हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आशिया चषकात टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. अशा परिस्थितीत रोहितसमोर प्लेइंग इलेव्हनची निवड करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण 17 खेळाडूंपैकी प्रत्येकाला सामना खेळण्याची संधी मिळू शकणार नाही. चला तर जाणून घेऊया आशिया कपमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कोणती असू शकते आणि कोणते पाच खेळाडू असतील ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही.
आशिया कपमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन जवळपास स्पष्ट झाली आहे. मात्र, मधल्या फळीत काही बदल नक्कीच अपेक्षित आहेत. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे, ज्यांचे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाजीचे रेकॉर्ड प्रभावी आहे. अशा स्थितीत आशिया कपसाठी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल असे वाटत नाही. तथापि, अय्यर आणि केएल राहुल जेव्हा त्यांचा फिटनेस पूर्णपणे सिद्ध करतील तेव्हा हे शक्य होईल. कारण दुखापतीतून बरे झाल्यानंतर हे दोन्ही खेळाडू टीम इंडियामध्ये परतणार असून त्यांनी अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले नाहीत.
टॉप ऑर्डरची चर्चा करायची झाल्यास रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. शुभमनची बॅट चालली नाही, तर ईशानला ओपनिंगमध्ये संधी मिळू शकते. तिसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीचे स्थान निश्चित आहे. अय्यरच्या पुनरागमनामुळे तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर उतरू शकतो. उपकर्णधार हार्दिक पंड्या सहाव्या स्थानावर असेल.
त्याच वेळी, सातव्या स्थानासाठी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोन खेळाडूंमध्ये चुरस आहे. हे दोन्ही खेळाडू फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. शार्दुल ठाकूरला 9व्या क्रमांकावर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह 10व्या आणि 11व्या क्रमांकावर असू शकतात.
आशिया चषक स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघात केवळ 11 जणांनाच सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. अशा स्थितीत असे 5 खेळाडू आहेत ज्यांना मैदानात उतरण्याची संधीच मिळणार नाही. या यादीत तिलक वर्माचे नाव प्रथम येते. तिलकने टी-20 मध्ये शानदार पदार्पण केले आहे, परंतु केएल राहुलच्या पुनरागमनामुळे त्याचे स्थान निश्चित नाही. फलंदाजीसोबतच राहुल विकेटकीपिंगही सांभाळणार आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसेल. कारण एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे रेकॉर्ड खूपच खराब आहे. तर बुमराह आणि शमीचे पुनरागमन झाल्याने प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळेल अशी शक्यता वाटत नाही.
त्याचवेळी मोहम्मद सिराजला सुद्धा जागा मिळेल की नाही हे निश्चित नाही. याशिवाय कुलदीप यादवचीही तीच परिस्थिती आहे. तो आपल्या फिरकीने निश्चितच ब्रेकथ्रू देतो, पण फलंदाजीचा विचार केल्यास तिथे पटेलला प्राधान्य दिले जाऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.