Latest

PAK vs SL Asia Cup : पाकिस्तान 200 पार, निम्मा संघ तंबूत

रणजित गायकवाड

पुढारी स्पोर्ट्स डेस्क : PAK vs SL Asia Cup : आशिया कपमधील श्रीलंका-पाकिस्तान सुपर-4 सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झाला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना 42-42 षटकांचा आहे. पाकिस्तानची धावसंख्या 38 षटकांत 5 बाद 209 अशी आहे.

रिझवानचे अर्धशतक

मोहम्मद रिझवानने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने इफ्तिखार अहमदसोबत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.

सामना 8.10 वाजता सुरू

कोलंबोमध्ये पाऊस थांबला असून रात्री 8.10 वाजता खेळ सुरू झाला. षटकांमध्ये पुन्हा कपात करण्यात आली आहे. एक डाव 42 षटकांचा करण्यात आला आहे. याआधी एक डाव 45 षटकांचा होता.

पावसामुळे खेळ थांबला

कोलंबोमध्ये पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. 27.4 षटकात पाकिस्तानची धावसंख्या 5 बाद 130 आहे. मोहम्मद रिझवान क्रीजवर आहे. इफ्तिखार अहमदला त्याच्यासोबत फलंदाजीला यायचे आहे, मात्र पावसामुळे तो अद्याप क्रीझवर येऊ शकलेला नाही. पाऊस वाढला आहे आणि ग्राउंड स्टाफने संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकले आहे.

पाकिस्तानचा निम्मा संघ 130 धावांवर पॅव्हेलियनमध्ये

पाकिस्तानचा निम्मा संघ 130 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद नवाजच्या रुपात पाकला पाचवा झटका बसला. नवाज 12 धावा करून बाद झाला. त्याला महिष तेक्षानाने बोल्ड केले.

अब्दुल्ला शफीकचे अर्धशतक

आशिया चषक स्पर्धेत पहिलाच सामना खेळणा-या अब्दुल्ला शफीक याने अर्धशतक झळाकावले. पाकचा संघ अडचणीत असताना त्याने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. पण तो 21.4 व्या षटकात तो पाथिरानाच्या गोलंदाजीवर बाद झाला. शफीकने 69 चेंडूत 52 धावा केल्या. पाकिस्तानला हा तिसरा झटका होता. यावेळी त्यांच्या संघाची धावसंख्या 3 बाद 100 होती.

बाबरला बाद

73 धावांवर पाकिस्तानची दुसरी विकेट पडली. बाबर आझम 35 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. दुनिथ वेल्लालागेने कुसल मेंडिसकरवी यष्टीचीत करून पाक कर्णधाराला आपल्या जाळ्यात अडकवले.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने संघात आणखी दोन नव्या चेह-यांना संधी दिली आहे. म्हणजेच संघात एकूण 5 बदल केले आहेत. तर श्रीलंकेनेही दोन बदल केले आहेत. या सामन्यातील विजयी संघ 17 सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे.

पाकिस्तानची पहिली विकेट

नऊ धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली. प्रमोद मदुशनने फखर जमानला क्लीन बोल्ड केले. फखरने 11 चेंडूत चार धावा केल्या.

श्रीलंका प्लेइंग-11

दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, डुनिथ वेल्लालागे, महिश तेक्षाना, मथिश पाथिराना आणि प्रमोद मदुशान.

पाकिस्तान प्लेइंग-11

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि जमान खान.

खेळपट्टीचा अहवाल

आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे. चेंडूला वळण आणि बाउन्स मिळत असल्याने येथे चांगल्या फिरकीपटूंना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जेरीस आणण्याची संधी आहे. तसेच मैदानाची आऊटफिल्ड वेगवान तर खेळपट्टीपासूनचे सीमारेषेपर्यंतचे अंतर लहान आहे. त्यामुळे फलंदाजांनाही फायदा मिळू शकतो. मात्र, फिरकीपटूंना अनुकुल असलेल्या या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणे खूपच आव्हानात्मक ठरू शकते. परिणामी टॉस जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार प्रथम फलंदाजी करून लक्ष्याचा बचाव करू शकतो.

पावसामुळे सामना रद्द झाला तर?

दरम्यान, हा सामना पावसामुळे वॉशआउट झाल्यास, पाकिस्तानपेक्षा (-1.892) चांगल्या नेट रनरेटमुळे श्रीलंकेचा (-0.200) संघ अंतिम फेरीत पोहोचेल. सध्या, श्रीलंका सुपर 4 गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे गुण 2-2 आहेत. सामना रद्द झाल्यास 1-1 गुण देण्यात येईल. त्यामुळे पाक-श्रीलंकेचे गुण पुन्हा समान राहतील. त्यावेळी नेट रनरेटच्या आधारे श्रीलंका आरामात अंतिम फेरीत पोहचेल.

हेड टू हेड

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 155 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. पाकिस्तानने 92 तर श्रीलंकेने 58 सामने जिंकले आहेत. 4 सामन्यांचा निकाल लागलेला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला आहे. शेवटच्या वेळी 2019 मध्ये हे दोन्ही संघ एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तान जिंकला होता. आता पुन्हा आजचा सामना जिंकण्यात पाकिस्तानला यश आले तर त्यांचा हा श्रीलंकेवरचा सलग नववा विजय ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT