Latest

Asia Cup 2023 : टीम इंडियाला धक्का! केएल राहुल दोन सामन्यांतून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीतून पुनरागमन करणारा केएल राहुल स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी याबाबत स्पष्ट केले. भारत 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आशिया चषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर 4 सप्टेंबरला नेपाळ विरुद्ध लढत होईल.

बंगळूरमधील अलूर येथे सध्या भारतीय संघाचे सराव शिबिर सुरू आहे. मंगळावारी शिबिराचा शेवटचा दिवस होता. संघ श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, केएल राहुल बंगळूरमधील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी)मध्येच राहणार आहे. तो टीम इंडियासोबत श्रीलंकेला जाणार नाही. आशिया चषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधील पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध तो खेळू शकणार नाही. स्पर्धेच्या सुपर-4 टप्प्यापूर्वी 4 सप्टेंबरला राहुलचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. जर तो फिट असेल तर तो श्रीलंकेला पोहोचेल.' (Asia Cup 2023)

द्रविड यांच्या विधानानुसार भारतीय संघ सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरला तरच राहुलचे पुनरागमन शक्य आहे. दरम्यान, इशान किशन हा पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळणार असल्याचा खुलासा भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी केला आहे.

पहिल्या काही सामन्यांसाठी राहुलच्या उपलब्धतेवर शंका उपस्थित करण्यात आली होती. बीसीसीआयचे चिफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) संघ निवडीची घोषणा करताना याबाबत खुलासा केला होता. दरम्यान, राहुल हा आशिया चषक स्पर्धेतील उर्वरित खेळाडूंसह अलूर येथे 6 दिवसांच्या फिटनेस आणि वैद्यकीय शिबिरात सहभागी झाला होता. पण यावेळी त्याने यो-यो फिटनेस टेस्ट दिली नसल्याचे समोर आले आहे.

राहुलला आयपीएल लीग सामन्यादरम्यान मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो बराच काळ मैदानापासून दूर होता. त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याने श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये बराच काळ घालवला. बुमराह आणि अय्यर हे फिट झाले आहेत. पण राहुलला नवी दुखापत झाल्याचे समजते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT