पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी फेरीनिहाय आघाडी घेतल्याने मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहण्यास मिळत आहे. कार्यकर्त्यांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत चालली आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. 26 वी फेरी होईपर्यंत ही आघाडी कायम आहे. मतमोजणीचा कल जसाजसा स्पष्ट होत आहे, तशीतशी कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा वाढत चालली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वगळता इतर कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर फिरताना दिसत नाहीत. सकाळच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र, जसजसे मतमोजणीच्या फेऱ्यांतून अश्विनी जगताप यांच्याकडे मतदानाचा
कल झुकू लागल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले तसेतसे महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते वगळता अन्य कार्यकर्ते माघारी परतल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे
कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून
उन्हाचा तडाका कायम असताना मतदान केंद्राबाहेर जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. तळपत्या उन्हात हे कार्यकर्ते तहान भागवण्यासाठी पाणी, ताक, उसाचा रस, शहाळे आदींचा आधार घेताना पाहण्यास मिळाले. काळेवाडी फाटा-देहू -आळंदी बीआरटीएस रस्त्याच्या एका कडेला थेरगाव येथे कार्यकर्ते निकालाच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबले आहेत. खूप ऊन असल्याने त्यांनी हॉटेलचे शेड, झाडांची सावली आदींचा आधार घेतला आहे.