नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस आता मोठ्या बदलाच्या दिशेने जात आहे. दशकानंतर गांधी कुटुंबीयांबाहेरचा अध्यक्ष पक्षाला मिळू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पक्षातले वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत आग्रह केल्याचे समजते. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड 21 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. याचा सविस्तर कार्यक्रम पक्षातर्फे लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्यातच मंगळवारी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची '10 जनपथ'वर भेट घेतली. यावेळी सोनियांनी गेहलोत यांना पक्षाचे नेतृत्व सांभाळण्याबाबत आग्रह केल्याचे समजते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना स्वतःला पक्षाची जबाबदारी सांभाळता येत नाहीय, असेही त्यांनी सांगितल्याचे
समजते.
याबाबत गेहलोत म्हणाले की, मी प्रसारमाध्यमांतून याविषयी ऐकले. मला याबाबत काहीच माहिती नाही. मला जी जबाबदारी दिली आहे ती मी सांभाळत आहे. राहुल गांधीच अध्यक्षपदासाठी सर्वसंमतीचे उमेदवार आहेत. ते अध्यक्ष बनले तरच पक्षाची पुनर्बांधणी होईल. ते अध्यक्ष नसतील तर नेते, कार्यकर्ते निराश होतील. आम्ही राहुल गांधींवर अध्यक्षपदासाठी सातत्याने दबाव टाकू. तर दिग्विजय सिंह यांनी मात्र राहुल गांधी अध्यक्षपद न स्वीकारण्यावर ठाम असतील तर त्यांना कुणीही सक्ती करणार नाही, असे म्हटले आहे
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा देखील सोनियांसोबत जाणार आहेत. सरचिटणीस आणि प्रवक्ता जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. 28 ऑगस्टला होणार्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत गांधी कुटुंबातील सदस्य आभासी पद्धतीने उपस्थित असतील. राहुल गांधी 4 सप्टेंबरला काँग्रेसतर्फे रामलीला मैदानावर होणार्या 'महागाईवर हल्लाबोल' रॅलीसाठी पतरणार आहेत. तथापि, ते भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करतील की नाही, हे स्पष्ट नाही.
सोनियांनी गेहलोत यांना केलेल्या आग्रहाचे दोन अर्थ काढले जात आहेत. एकतर राजस्थानमध्ये पक्षातील असंतोष मिटविणे. गेहलोत यांना अध्यक्षपद देऊन सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. राजस्थानच्या आगामी निवडणुका पायलट यांच्या नेतृत्वाखाली लढता येतील. तसेच राष्ट्रीय स्तरावर पक्षाला बिगर गांधी अध्यक्ष देऊन, मोठा बदल घडवता येईल.
काँग्रेस संघटनेचे प्रभारी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता काँग्रेस कार्यकारिणीच्या आभासी बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होणार्या यात काँग्रेस अध्यक्षपदाची तारीख ठरणार आहे.