मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने एका मंचावर येणे काँग्रेसला खटकले आहे. शरद पवारांच्या या भूमिकेने संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले की, अशा कार्यक्रमात उपस्थित राहणे मला चुकीचे वाटत नाही. कारण, तो एका खासगी संस्थेचा कार्यक्रम होता. अशा कार्यक्रमात भिन्न विचाराचे राजकीय नेते एकत्र येणे वावगे नाही; पण आज देशात वेगळे वातावरण आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष एकजूट करत आहेत. इंडिया या बॅनरखाली देशातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्यात शरद पवारही आहेत. अशावेळी त्यांनी मोदी यांच्यासोबत एका मंचावर सहभागी होणे हे संभ्रम निर्माण करणारे आहे. अशा कार्यक्रमातील उपस्थितीमुळे संभ्रम हा निर्माण होऊ शकतो.
शरद पवारांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे लोकांमध्ये जर चर्चेचा विषय झाला असेल, तर त्यांनी तो दूर करावा. पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. लोकांमधील संभ्रम त्यांनी जर दूर केला तर अधिक चांगले होईल, असेही चव्हाण म्हणाले.