मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या जागावाटपात पारंपरिक जागा राखण्यात काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अपयशी ठरले. वाटाघाटीची क्षमता नाही, जागा आपल्या पदरात पाडण्याइतपतही अभ्यास नसलेल्या या नेत्यांची ठाकरे आणि पवारांसोबतच्या चर्चेत धूळधाण उडाली आहे. इच्छुकांच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत नाही, पक्षनेतृत्वाला काय उत्तर द्यायचे हे माहीत नसल्याने आता माझ्यावर खापर फोडण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका भाजप नेते, खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसकडून अशोक चव्हाण होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी चर्चेत घोळ घातल्यानेच काँग्रेसला पारंपरिक जागा राखता आल्या नसल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. यासंदर्भातील चर्चांवर अशोक चव्हाण यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. मी काँग्रेस सोडून दीड महिना उलटला आहे. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो, तोपर्यंत पारंपरिक जागांसाठी माझाच आग्रह होता, असे अशोक चव्हाण म्हणाले.
काँग्रेसचे तिकीट वाटपात अपयश, ज्याचे शेवटी रूपांतर पराभवात होणार आहे. त्यामुळे त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा प्रकार हास्यास्पद आहे. यांना जागावाटपात कसलेच स्वारस्य नव्हते. बैठकीच्या नावाखाली नुसत्या गप्पा आणि फाईव्ह स्टारमध्ये जेवणावळी करायचे. इच्छुकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या रोषाला सामोरे जाण्याची हिंमतही काँग्रेसच्या या नेत्यांकडे नाही, असेही चव्हाण म्हणाले.