Latest

History of Ashes : ‘इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू’ आणि ‘ॲशेस’चा जन्म, जाणून घ्या क्रिकेट ट्रॉफीचा इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : History of Ashes : क्रिकेटच्या इतिहासातीलच सर्वात मोठी आणि ऐतिहासिक 'अॅशेस' मालिकेला 16 जूनपासून सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांना भिडताना दिसतील. दोन्ही संघ अॅशेस जिंकण्यासाठी जीवाचे रान करतात. यंदाच्या मालिकेतील सामने इंग्लंडमधील हिरव्यागार मैदानांवर खेळवले जाणार आहेत. पहिला सामना एजबॅस्टन येथे होणार आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो की, या शत्रुत्वाची सुरुवात कुठून झाली आणि त्याचे नाव 'अॅशेस' का ठेवले गेले?

29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लंडचे गर्वहरण

1861 सालापासून दोन्ही देश एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळत आले आहेत. कधी इंग्लंड टीम ऑस्ट्रेलियातील मैदानावर क्रिकेट सामना खेळायची तर कधी ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडमधील मैदानावर सामना खेळायची. हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आल्याने सुरवातीला इंग्लंडचेच क्रिकेटवर वर्चस्व होतं. इंग्लंडची टीम इतकं भारी क्रिकेट खेळायची की या टीमविरुद्ध जिंकणं अशक्य होतं. इंग्लंडच्या टीमला बाहेरील देशांतील मैदानावर कधी कधी पराभवाचा सामना करावा लागायचा मात्र घरच्या मैदानावर ते अजिंक्य होते. याचा त्यांना खूप गर्व होता. पण या गर्वाचे हरण 1882 साली झाले.

1882 च्या ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या दौ-यावर गेला होता. मालिकेतील पहिला कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळला गेला. तो सामना कांगारूंनी जिंकून इतिहास रचला. इंग्लंडने पहिल्यांदाच मायदेशात कसोटी सामना गमावला होता. या पराभवाने ब्रिटीश मीडियाने इंग्लिश संघावर जोरदार टीका केली.

केवळ चार चेंडूंचे षटक… ओव्हलवरील 'त्या' सामन्यात काय घडले? (History of Ashes)

ऑस्ट्रेलियन कर्णधार बिली मरडॉक याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या या निर्णयाची इंग्लिश गोलंदाजांनी धूळधाण उडली आणि कांगारूंचा पहिला डाव फक्त 63 धावांत गुंडाळला. त्याकाळी केवळ चार चेंडूंचे 'षटक' टाकले जात असे. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने 53.2 इतकीच षटके खेळून काढली.

इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवातही निराशाजनक झाली. क्रिकेटचे पितामह समजले जाणारे डब्लू जी ग्रेस केवळ 4 धावांवर बाद झाले. इतर फलंदाज सुद्धा झटपट तंबूत परतले. त्यामुळे दिवसाअखेरीस इंग्लंडचा डाव 101 धावांवर संपुष्टात आला. द डेमन म्हणजेच राक्षस या नावाने प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फ्रेड स्पॉप्पोर्थ या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. ग्रेस सह त्याने इतर सहा ब्रिटीशांना माघारी धाडले होते. दरम्यान, इंग्लंडने पहिल्या दिवसाअखेरीस 38 धावांची आघाडी मिळवली, जी फार महत्वाची होती.

दुसऱ्या दिवशी ओव्हलचे मैदान दर्शकांनी फुलून गेले. ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज हयुग मॅस्सी याने आक्रमक पवित्रा घेत 60 चेंडूंमध्ये 55 धावा फटकावल्या. मॅस्सी बाद झाल्यानंतर कांगारूंच्या संघाची अवस्था बिनबाद 66 वरून 5 बाद 79 अशी झाली. कर्णधार बिली मरडॉकच्या 29 धावांमुळे ऑस्ट्रेलियन संघाने कशीबशी 122 धावांपर्यंत मजल मारली. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी केवळ 85 धावांचे लक्ष्य मिळाले. धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लिश सलामीवीर मैदानात उतरले. स्पॉप्पोर्थने पुन्हा एकदा भेदक मारा केला आणि इंग्लिश फलंदाजीला खिंडार पाडले. 32 धावा केल्यानंतर दिग्गज ग्रेसला हॅरी बॉईलने बाद केले तेव्हा इंग्लंडची अवस्था 4 बाद 54 अशी झाली होती. पण विजयासाठी 31 धावांची गरज होती जी सहज पार केली जाईल असा इंग्लंडच्या इतर खेळाडूंना विश्वास होता. पण कांगारूंच्या मा-यापुढे इंग्लंडची 4 बाद 54 वरून 5 बाद 66, 6 बाद 70, 7 बाद 70, 8 बाद 75 आणि 9 बाद 75 अशी दाणादाण उडाली. या पाच पैकी चार फलंदाजांची शिकार स्पॉप्पोर्थने केली होती. शेवटची जोडी मैदानावर असताना इंग्लंडला विजयासाठी केवळ दहा धावा हव्या होत्या. मैदानावर प्रचंड तणावाचे वातावरण होते.

बॉयलने टेड पीटचा त्रिफळा उडवत इंग्लंडचा 77 धावांवर ऑलआऊट केला. ऑस्ट्रेलियाने अवघ्या सात धावांनी अभूतपूर्व असा विजय मिळवला. मैदानावरचा प्रत्येक इंग्लिश प्रेक्षक सुन्न झाला होता. स्वतःच्या मायभूमीवर पराभव पचवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. ऑस्ट्रेलियन फ्रेड स्पॉप्पोर्थने पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 7 अशा एकूण 90 धावांत 14 विकेट्स मिळवल्या.

'इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू'

हा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी लागला. 'द स्पोर्टिंग टाईम्स' (The Sporting Times) नावाच्या वृत्तपत्राने तर इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू (Death of English cricket) या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला. त्यात म्हटले होते की, '29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लिश क्रिकेटचा द ओव्हल येथे मृत्यू झाला. याचे आम्हा सर्वांना प्रचंड दुःख आहे. यांचे दहन करून त्याची राख ऑस्ट्रेलियाला नेली जाईल,' अशी आगपाखड केली होती.

इंग्लंडमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाला आहे आणि राख ऑस्ट्रेलिया टीम घेऊन गेली असे प्रत्येकजण म्हणू लागले. इंग्लंडच्या बलाढ्य संघाला हा मोठा धक्का होता. सर्व खेळाडू सुन्न झाले होते. पण मनात बदला घेण्याची भावना पेटून उठली होती. ऑस्ट्रेलियाला हरवून आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर द्याचे हे खेळाडूंनी ठरवले. योगायोगाने 1983 मध्ये इंग्लंडचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया गेला. इंग्लिश खेळाडू याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. ईओ ब्लिगच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ कांगारूंच्या मैदानात उतरला. त्यांनी जोरदार कमबॅक केले. तीन सामन्याच्या या मालिकेतील दोन कसोटी जिंकून इंग्लंडने बदला तर घेतलाच सोबत एका नव्या मालिकेला सुरवात झाली.

या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियातील एका महिला क्रिकेट चाहतीने इंग्लंडचा कर्णधार ब्लिगला एक ट्रॉफी दिली. या ट्रॉफीत 29 ऑगस्ट 1882 ला झालेल्या त्या सामन्यातील एका बेल्सची राख होती. इंग्लिश संघाने गंमतीत दिलेल्या या ट्रॉफीला गांभीर्याने घेतले आणि ती ट्रॉफी इंग्लंडला घेऊन आले. तेव्हापासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅशेस मालिका सुरू झाली जी आजही सुरू आहे. आजही ही मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची आहे.

'अ‍ॅशेस' ट्रॉफी इंग्लंडमध्येच !

ऑस्ट्रेलियाने कितीही वेळा अ‍ॅशेस मालिका जिंकली तरी खरी अ‍ॅशेस ट्रॉफी इंग्लंडमध्येच राहणार आहे. जी छोटीशी ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दिली होती ती खूप नाजूक होती. यामुळे ती ट्रॉफी लॉर्डसच्या क्रिकेट मैदानावरच ठेवण्यात आलीय. अ‍ॅशेस मालिका जिंकल्यानंतर जी ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते ती या मूळ ट्रॉफीची डुप्लिकेट ट्रॉफी असते.

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ॲशेस मालिका जिंकल्या

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 72 अॅशेस मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी 34 कांगारूंच्या नावावर आहेत, तर 32 मालिका इंग्लंडने जिंकल्या आहेत. याशिवाय 6 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, दोन्ही संघांमध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा होत आली आहे. शेवटची ॲशेस 2021-22 मध्ये खेळली गेली होती, जी ऑस्ट्रेलियाने 4-0 ने जिंकली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT