ज्ञानक्षेत्रातील सर्वोच्च पदवी म्हणून पीएचडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये दरवर्षी 68 हजार लोक डॉक्टरेट पदवी मिळवितात. भारतामध्ये अलीकडील आकडेवारीनुसार ही संख्या 24 हजारांच्या जवळपास आहे. जगातील पीएचडीधारक राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक चौथा असला, तरी लवकरच भारत तिसर्या क्रमांकावर पोहोचेल, असा संशोधकांचा दावा आहे. यासाठी पीएचडी संशोधनाबाबतची नकारात्मकता सोडून देत त्याची बहुविध उपयुक्तता लक्षात घ्यावी लागेल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने त्या द़ृष्टीने केलेले बदल पथदर्शी आहेत.
आजच्या जगातील अर्थव्यवस्थेला नॉलेज इकॉनॉमी असे म्हटले जाते. धनसत्ता आणि बलसत्तेपेक्षा ज्ञानसत्ता ही श्रेष्ठ आहे, असे बिल गेटस् म्हणतात. पुढचा मार्ग हा माहितीचा महामार्ग आहे आणि या माहितीच्या महामार्गावर ज्ञानाचे सामर्थ्य अनन्यसाधारण असणार आहे. त्यामुळे ज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पदवी म्हणून पीएच.डी. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीला तेवढेच महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये दरवर्षी 68 हजार लोक डॉक्टरेट पदवी मिळवितात. भारतामध्ये अलीकडील आकडेवारीनुसार ही संख्या 24 हजारांच्या जवळपास आहे. जगामध्ये स्लॉवनिया या देशांमध्ये लोकसंख्येपैकी पाच टक्के, तर स्वित्झर्लंडमध्ये तीन टक्के लोक पीएचडीधारक आहेत. भारतामध्ये हे प्रमाण दोन टक्के एवढेच आहे. जगातील पीएचडीधारक राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक चौथा असला, तरी लवकरच भारत तिसर्या क्रमांकावर पोहोचेल, असा संशोधकांचा दावा आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून भारतीय शिक्षणाने आता कात टाकली आहे आणि संख्या, समानता व गुणवत्ता या सर्व आव्हानांशी सामना करत असताना भारताचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान संशोधन हे गतीने पुढे सरकत आहे. जगातील अन्य राष्ट्रांच्या तुलनेने विकसनशील राष्ट्रांमध्ये नव्या कल्पनांना उचलून धरण्याचा प्रकार कमी असतो. त्यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेल्या या पदवीविषयी विकसनशील समाजामध्ये प्रशंसा करण्याऐवजी तिला कसे कमी लेखता येईल, असाच प्रयत्न अधिक दिसतो.
भारतातही पीएचडीच्या गुणवत्तेविषयी बोलताना त्यातील श्रेष्ठ दर्जाविषयी वारंवार शंका घेतली जाते. जगातील प्रगत देशांच्या तुलनेत विचार करता भारतातील संशोधनाची अवस्था फारच निम्न आहे असे नाही. देशात विज्ञान क्षेत्रात हे संशोधन तिपटीने वाढले आहे. संशोधन करणार्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढलेली आहे. भारतामध्ये असलेल्या विद्यापीठांच्या संख्येचा विचार करता त्यापैकी सुमारे 800 संस्था अशा प्रकारच्या पदवीचे शिक्षण देत आहेत. शिवाय घटक राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे अशा प्रकारच्या संशोधनाचे प्रमाण 29 टक्के आहे. म्हणजे स्टँड अलोन संस्था, स्वतंत्र संशोधन संस्था असो, केंद्रीय विद्यापीठे असोत किंवा प्रायोगिक तत्त्वावर काम करणार्या वैज्ञानिक संशोधन संस्था असोत, त्यातील संशोधनाची गुणवत्ता ही निश्चितच श्रेष्ठ आहे. स्वातंत्र्यानंतर पीएचडी संशोधनातील भारताची वाटचाल खरोखरच स्पृहणीय राहिली आहे. जगातील अनेक देशांत विशेषतः अमेरिका, इंग्लंड, युरोपीय देश आणि विकसनशील देश आशिया व आफ्रिका खंडातील देश यामध्येही भारतीय अध्यापक संशोधनाचे कार्य चांगल्या प्रकारे करत आहेत. पीएचडी संशोधनाची उपयुक्तता ही त्रिविध स्वरूपात लक्षात घेण्यासारखी आहे. एक तर हे संशोधन ज्ञान क्षेत्रामधल्या अनेक समस्यांची उकल करते आणि नव्या ज्ञानाची भर टाकते.
पीएच. डी. ही एक ज्ञानप्रक्रिया असते. तेथे विषयाची निवड केल्यापासून त्याला काही गृहितके मांडावी लागतात. काही उद्दिष्ट्ये ठेवावी लागतात. ते करण्यासाठी त्याला संशोधनाची पद्धती आणि आराखडा घ्यावा लागतो. जॉन बेस्ट यांनी 'रिसर्च इन एज्युकेशन' या ग्रंथात असे म्हटले आहे की, संशोधनाचे अर्धे यश हे विषयाची निवड करण्यामध्ये असते. विषय जुना, रवंथ झालेला, बहुचर्चित नसावा. तो नवा आणि उपेक्षित असावा. अशा नव्या तुलनीय प्रश्नाचा जेव्हा शोध घेतला जातो तेव्हा त्यातून निर्माण झालेले सत्य जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते संशोधन वैश्विक बनते. ते त्रिकालाबाधित सत्य होते. त्यामुळेच आपण डार्विनचा सिद्धांत घ्या किंवा न्यूटनचा नियम घ्या किंवा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा भारतीय तत्त्वज्ञानावरील ग्रंथ घ्या; हा ग्रंथ एका पीएच.डी.च्या प्रबंधावर आधारलेला होता आणि त्या प्रबंधाला बि—टिश काळामध्ये उत्कृष्ट संशोधनाचे सुवर्ण पदक मिळाले होते. त्यांनी आपले संशोधन एवढ्या दर्जाचे केले की, त्यानंतर परदेशांतील प्रतिष्ठित महाविद्यालयांत त्यांनी व्याख्याने दिली आणि भारताच्या ज्ञानाचा झेंडा फडकवला. परदेशामध्ये केलेले पीएच.डी.चे संशोधन श्रेष्ठ असते आणि भारतामध्ये केलेले संशोधन कनिष्ठ असते ही कल्पना अत्यंत चुकीची आणि बोथट अशी आहे. खुद्द मी लिहिलेल्या 'आर्किओलॉजी ऑफ रिसेशन' या प्रबंधाला सुमारे पाच वर्षांमध्ये 21 लाख 35 हजार लोकांनी भेट दिली आहे. यावरून आपणास उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनाचे किती मूल्य असते, हे लक्षात येईल. एखादा संशोधक त्याच्याजवळ काहीही नाही, कफल्लक आहे; परंतु त्याच्याजवळ ज्ञानसामर्थ्य असेल, तर तो संशोधनाच्या आधारे तो जगाचा प्रवास करू शकतो. भारतामध्ये पीएच.डी.चा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रामुख्याने पाच गोष्टींचे नितांत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे पीएच.डी.विषयीची नकारात्मकता टाळली पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे पीएच.डी. संशोधकांना सारथी असो, बार्टी असो किंवा अन्य विद्यापीठ असो, त्यांना अध्ययनाबरोबरच अन्य उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रंथालये सुसज्ज असली पाहिजेत आणि ती 24 तास खुली असली पाहिजेत. कुठलेही ज्ञान कोंडून ठेवता येत नाही. ज्ञान आता आंतरविद्याशाखीय, बहुविद्याशाखीय, इंटरडिसिप्लनरी, मल्टिडिसिप्लनरी आणि क्रॉस डिसिप्लनरी बनले आहे. 'ऑल आर सायंटिस्ट' हा जपानचा द़ृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये पृथ्वीचा गोल पुन्हा पुन्हा फिरवायचा असेल आणि जग बदलून टाकायचे असेल, तर आपणास ज्ञानसाधनाच करावी लागेल. कार्ल मार्क्स असे म्हणाला होता की, विचारवंतांनी जग केवळ कसे आहे, हे सांगायचे नसते, तर ते बदलून दाखवायचे असते. मार्क्सने असेही म्हटले आहे की, शतकाच्या पलीकडे डोकावते ते खरे साहित्य, ते खरे विज्ञान, ते खरे संज्ञापन. शतकाच्या पलीकडे डोकावण्यासाठी भारताला ज्ञानसत्ता व्हावे लागेल.