मधुमेहाची व्याधी ही अनेकांसाठी जीवन दुष्कर करणारी ठरते. एकदा मधुमेह झाला की त्यानंतर हे रुग्ण सातत्याने विविध उपायांचा वापर करून रक्तशर्करा नियंत्रणासाठी प्रयत्न करताना दिसतात. अलीकडील काळात याबाबतच्या सल्ल्यांचे जणू पीकच आले आहे. परंतु, अशा उपायांमागचा शास्त्रीय आधार विचारात घेणे गरजेचे असते; अन्यथा त्या उपायातून अपेक्षित परिणाम साधणे तर दूरच, उलटपक्षी नुकसान होण्याची शक्यता असते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. बहुतांश मधुमेही त्याचे पालन करत असतात. पण, अलीकडील काळात चहा किंवा कॉफीमध्ये चवीसाठी साखरेऐवजी शुगर फ्री गोळ्या वापरण्याचा प्रघात रूढ झाला आहे. एका संशोधनानुसार, या कृत्रिम स्वीटनरमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांसह अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
या गोळ्यांमध्ये एस्पार्टम, सॅकरिन, सुक्रोज आणि रेबियाना यांसारखे पदार्थ असतात. शुगर फ्री टॅब्लेटच्या पॅकिंगवर ही नावे लिहिलेलीही असतात. आर्टिफिशियल स्वीटनर्स नैसर्गिक उत्पादनांच्या मदतीने तयार केले जात असले, तरी रासायनिक प्रक्रियेमुळे ते अधिक नुकसान करतात.
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधनानुसार, शुगर फ्री गोळ्यांमुळे चयापचयावर आणि पचनावर प्रतिकूल परिणाम होऊन लठ्ठपणा वाढतो. दीर्घकाळ त्यांचे सेवन केल्यास कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते.
याखेरीज शुगर-फ्री टॅब्लेटचा आतड्यांमधील बॅक्टेरियांवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे भूक कमी होते. लठ्ठपणा वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये, दीर्घकाळापर्यंत शुगर फ्री गोळ्या घेतल्याने देखील द़ृष्टिक्षीणतेची समस्या वाढत गेल्याचेही दिसून आले आहे.
काही लोकांना शुगर फ्री गोळ्या घेतल्याने डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी, निद्रानाश, अस्वस्थता इत्यादी लक्षणे देखील दिसतात.
अमेरिकेच्या सेंटर फॉर सायन्स इन पब्लिक इंटरेस्टच्या म्हणण्यानुसार, आर्टिफिशियल स्वीटनर्समुळे पोट भरल्यासारखे वाटत असले, तरी व्यक्तीला वारंवार भूक लागते. परिणामी, अतिरिक्त अन्नपदार्थांचे सेवन केले जाते आणि त्यातून वजन वाढते.
एक चमचा साखरेमध्ये 18 कॅलरीज असतात. शुगर फ्री गोळ्यांमध्ये कॅलरीज नसतात; परंतु त्या इतर मार्गांनी नुकसान करतात. म्हणूनच जे लोक शुगर फ्री सोडा, पेस्ट्री किंवा मिठाई घेतात त्यांच्या चयापचयावर दुष्परिणाम होतात. अमेरिकेच्या पॅड्र्यू युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, शुगर फ्री मिठाई आणि पेस्ट्री आदी पदार्थांचा हा कृत्रिम गोडवा लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतो.