Latest

रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अमृता चौगुले

सासवड, पुढारी वृत्तसेवा: रामोशी, बेरड, बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा मी यापूर्वीच केली होती व त्यावर कारवाई सुद्धा केली होती. मध्यंतरी सरकार गेले, परंतु आता आमचे सरकार असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे महामंडळ विनाविलंब मंजूर करणार आहे. दौलत शितोळे यांनी त्यावेळी १०० कोटींची मागणी समाजासाठी केली होती, परंतु आता अजून वाढीव १०० कोटी लागत असतील तरी आम्ही देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भिवडी (ता पुरंदर) येथील हुतात्मा उमाजी विद्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी बुधवारी (दि. ७) त्यांच्या २३१ वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, राहुल कुल, जयकुमार गोरे, संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, बाळा भेगडे, योगेश टिळेकर, बाबा जाधवराव, जालिंदर कामठे, तात्यासाहेब भिंताडे, शामकांत भिंताडे, प्रशांत वांढेकर, साकेत जगताप, बापू मोकाशी तसेच राजे उमाजी नाईकांचे वंशज चंद्रकांत खोमणे, रमण अण्णा खोमणे यांच्यासह राज्यातील विविध भागांतून हजारोंच्या संख्येने आलेला रामोशी समाज उपस्थित होता.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीला २०१९ मध्ये मला बोलावले होते. परंतु त्यावेळी निवडणुका आल्या. तुम्ही सर्वांनी मिळून भाजप व शिवसेनेला निवडून दिले, परंतु दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले, परंतु राजे उमाजी नाईक यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता म्हणून आम्ही पुन्हा एकदा भाजप आणि भगव्या आणि छत्रपतींचा सन्मान ठेवणारे एकनाथ शिंदे भगवा झेंडा घेऊन आमच्या सोबत आले. मुख्यमंत्री आणि मी तुम्ही दिलेल्या मागण्या पूर्ण करू तसेच सर्व बहुजन समाजाच्या मागण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी समाजाच्या विविध मागण्या उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बेरड, बेडर, रामोशी व त्यांच्या तत्सम जमातींचा समाजशास्त्रीय व मानववंशीय शास्त्रीय पद्धतीने सखोल अभ्यास करून केंद्र शासनाकडे या जमातींचा अनुसूचित जाती जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात योग्य ती शिफारस करावी. रामोशी समाजाच्या विकासासाठी राजे उमाजी नाईक यांचे नावे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी आणि १००० कोटींची भरीव तरतूद करावी, शासकीय व निमशासकीय जमिनीवरील राहती घरे व वहिवाटीखाली असणारी क्षेत्र नियमित करण्यात यावे, धनदांडग्यांनी बळकावलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या इनाम वर्ग जमिनी रामोशी समाजाला परत कराव्यात, रामोशी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर मराठी चित्रपट निर्मितीसाठी भरीव निधीची तरतूद करावी, हुतात्मा स्मारक उभारणे, सुशोभीकरण, देखभाल व दुरुस्ती करण्यास निधी मिळावा, क्रीडा शैक्षणिक संकुल, वसतिगृह उभारणीसाठी मदत मिळावी यांचा समावेश होता.

राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्याचे आयोजन दौलतनाना शितोळे, रामदास धनवटे, अंकुश जाधव, संजय जाधव, युवक अध्यक्ष रोहिदास मदने, सुधीर नाईक, गंगाराम जाधव, गणपत शितकल, लालासाहेब भंडलकर, दीपक चव्हाण, संतोष चव्हाण, गणेश गावडे, साहेबराव जाधव, विशाल माकर, सीताराम चव्हाण, गणेश खोमणे आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT