नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुस्तीपटूंना न्याय मिळाला नाही तर आपण आपली पदके परत करु, असा इशारा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि प्रशिक्षक महावीर फोगट यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला दिला. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना तातडीने अटक केली जावी, अशी मागणीही फोगट (Mahavir Phogat) यांनी केली.
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत कुस्तीपटूंनी मागील काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन चालविलेले आहे. ज्या प्रकारचे आरोप सिंग यांच्यावर झाले आहेत, ते पाहता त्यांना अटक होणे आवश्यक आहे, प्रतिक्रिया महावीर फोगट यांनी दिली. महावीर फोगट (Mahavir Phogat) हे तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते.
या विषयासंदर्भात सरकार अथवा पक्षातील कोणा वरिष्ठासोबत तुमची चर्चा झाली आहे काय, असे विचारले असता फोगट यांनी नकारार्थी उत्तर दिले. कुस्तीपटूंना समर्थन देत हरियानाच्या विविध भागात खाप पंचायतींनी आंदोलन सुरू केले आहे. हिसार, भिवनी, जिंद आणि रोहतक या ठिकाणच्या खाप पंचायतींनी कुस्तीपटूंना न्याय दिला जावा, अशी मागणी केली आहे.