अनेक प्रकारच्या आजारांवर गुग्गुळ ही गुणकारी वनस्पती ठरते. आयुर्वेदात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असले तरी आता आपल्याकडे या वनस्पतीचा र्हास होत आहे. त्यामध्ये वाढ करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांमुळे सध्या सार्या जगाने वनस्पतीजन्य औषधांचा स्वीकार केला असल्याचे चित्र आहे. भारतात आयुर्वेदाचा उगम झाला, त्याचा बदलत्या वैज्ञानिक संशोधनामुळे र्हास झाला; परंतु आयुर्वेदाचा पाश्चिमात्य देेशांनी केलेला स्वीकार आयुर्वेदशास्त्राला उभारी देत आहे. आयुर्वेेदाच्या या प्रगतीमध्ये गुग्गुळ या वनस्पतीजन्य औषधाने भर घातली आहे.
सांधेदुखी, हृदयरोग, गंडमाला, आमवात, त्वचारोग, दंतरोग, कृमीनाशक, मूळव्याध, भगंदर, कुष्ठरोग, नेत्ररोग, पांडुरोग, मूत्रविकार, स्त्रीरोग, सूज कमी करणे, मोडलेले हाड जोडणे आदी विकारांवर गुग्गुळ वनस्पती गुणकारक आहे; परंतु या वनस्पतीचा भारतात र्हास होत चालला आहे. या वनस्पतीचा भारत सरकारने दुर्मीळ वनस्पतींच्या यादीत समावेश केला आहे.
एकेकाळी भारतातून गुग्गुळ वनस्पतीची निर्यात होत होती; परंतु डिंक काढण्याच्या अशास्त्रीय पद्धतीमुळे गुग्गळाची बरीच झाडे नाश पावली आणि त्याची पुन्हा लागवड झालीच नाही. परिणामी, गरज भागवण्याकरता देशाला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या भारताला दरवर्षी पाच ते सहा हजार टन गुग्गुळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आयात करावे लागत आहे. दिवसेेंदिवस दुर्मीळ होत जाणारी वनस्पती आणि वाढती गरज लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार गुग्गुळ लागवडीस प्रोत्साहन देत आहे. एकरी 48,000 रुपये अनुदान भारत सरकाने गुग्गुळ लागवडीसाठी मंजूर केले आहे.
दहा वर्षांपासून भारत सरकारने गुग्गुळ संशोधनावर भर दिला आहे. या वनस्पतीवरील सर्वांत जुने केंद्र जयपूर जवळील मंगालीयावास येथे असून गुजरात, पंजाब, हरियाणा, विविध कृषी विद्यापीठांत या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधनात नवीन जाती शोधणे, नर्सरी वाढवणे, टिश्यू कल्चरने रोपे तयार करणे, डिंक काढण्याच्या पद्धतीवर संशोधन करणे आदी विषयांवर अभ्यास केला जात आहे.
गुग्गुळावर 2007 मध्ये जयपूर येथे एक दिवसाचे आणि जोधपूर येथे तीन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले होते. यात नामवंत व्यक्तींनी सहभाग घेतला होता. केवळ एकाच वनस्पतीवर चर्चासत्र भरते यावरून गुग्गुळाचे महत्त्व स्पष्ट होते.
गुग्गुळाचे झाड 12 ते 15 फूट वाढणारे असून ते कोणत्याही जमिनीत येते. उष्ण आणि कोरडे हवामान या वनस्पतीसाठी पोषक आहे. या झाडाला काटे येत असल्यामुळे जनावरे खाण्याची भीती आहे. गुग्गुळाची लागवड केल्यानंतर सहा वर्षांनतर डिंक मिळण्यासाठी सुुरुवात होते. त्याचबरोबर व्यापारी उत्पादन मिळवण्यासाठी अंदाजे आठ वर्षे लागतात.
बियांपासून रोपांचे उत्पादन 5 टक्केपर्यंतच होते. त्यामुळे रोपांचे निर्माण कटिंग्जपासून केले जाते. अंदाजे तीन ते चार महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. लागवडीपासून सहा फूट रोपांतील अंतर आणि सहा फूट रांगेचे अंतर ठेवावे. खड्डा घेतल्यानंतर त्यात पालापाचोळा दोन पाट्या कुजलेले शेणखत, दोन किलो निंबोळी पावडर मिसळून खड्डा भरून घ्यावा. शक्यतो पावसाळ्यात लागवड करणे फायद्याचे ठरते. पावसाळ्यानंतर फेबु्रवारीपर्यंत महिन्यातून 1 वेळा पाणी द्यावे. वर्षातून दोन वेळा शेणखत दिल्यास उत्पादन वाढू शकते.
या वनस्पतीवर शक्यतो रोग पडत नाही; परंतु पांढर्या माशीचा प्रादुर्भाव वनस्पतीवर होऊ शकतो. या वनस्पतीचे आयुष्य 400 ते 500 वर्षे असल्याने पुढील कित्येक पिढ्या ही वनस्पती चांगली गुंतवणूक ठरते. पडीक जमिनीवर फारसे कष्ट न घेता सुरुवातीच्या लागवडीसाठी येणार्या खर्चापैकी 80 टक्के सरकारी अनुदान उपलब्ध आहे.