पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेव्हुण्याला गावाकडील घर बांधण्यासाठी पैसे दिल्यानंतर ते पैसे मागितल्याच्या रागातून पत्नीने पतीच्या अंगावर गरम पाणी टाकल्याचा धक्कादायक प्रकार शिवणे येथे घडला. यात पती गंभीर जखमी झाला आहे. महादेव अर्जुन जाधव (30,रा. शिवणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी कविता (28) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव जाधव हे मूळचे बीड येथील केकन पांगारी येथील रहिवासी आहेत.
ते शिवणे येथे पत्नी कविता आणि सात वर्षांची मुलगी दीक्षा यांच्या बरोबर राहत आहेत. ते भाजीपाला विक्रीचा व्यावसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांच्या मेव्हुण्याला घर बांधण्यासाठी 2 लाख 40 हजार रुपये दिले होते. परंतु, जाधव यांना जमीन खरेदी करायची असल्याने मेव्हुणा गोरख राठोड हा पैशाची मागणी करूनसुद्धा पैसे परत देत नव्हता.
यामुळे त्यांच्यात 11 जुलैच्या दुपारी फोनवर बाचाबाची झाली. त्यातूनच त्याने आपल्या दाजींविषयी बहिणीजवळ राग व्यक्त केला. यातून पती-पत्नींमध्येदेखील बाचाबाची झाली. 13 जुलैला पहाटे साडेतीनच्या सुमारास जाधव हे घरात झोपले असताना पत्नीने पतीच्या अंगावर गरम पाणी ओतून त्यांना जखमी करत खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर ती पळून गेली. त्यानंतर जाधव यांनी घराजवळच राहणार्यांना घरी जाऊन सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा