नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) केंद्र सरकारने १ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुढील ५ वर्षांमध्ये या दलांसाठी अत्याधुनिक हत्यारांची खरेदी केली जाईल तसेच या दलांचे माहिती तंत्रज्ञान यंत्रणेत सुधारणा करण्यात येईल. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये सीआरपीएफ तसेच बीएसएफचा देखील समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार CAPF च्या आधुनिकीकरण योजना-४ लागू केल्याने या दलांची दक्षता वाढवण्यासाठी तसेच तयारीमध्ये सुधारणा आणण्यास मदत मिळेल. यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणा बळकट होईल. १ फेबुवारी २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सीएपीएफच्या आधुनिकीकरणाची ही योजना राबविण्यात येईल.
अद्ययावत अत्याधुनिक शस्त्रसामुग्री आणि उपकरणे यांच्या आवश्यकतेनुसार, वेगवेगळ्या विभागात त्यांच्या तैनातीची पद्धत लक्षात घेत, त्याची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दले सुसज्ज होतील. याशिवाय या योजनेतून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडील माहिती तंत्रज्ञान विषयक सुविधा अद्ययावत केल्या जातील, असे मंत्रालयकडून सांगण्यात आले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना संपूर्ण परिचालन क्षमतेत सुधारणा आणि सुसज्जता येईल ज्याचा देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा या भागात तसेच कडवी डावी विचारसरणी प्रभावित क्षेत्रे, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश, लडाख आणि ईशान्य भारतातील अशांत भागातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारचे सामर्थ्य वाढवेल, असा विश्वास मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ : युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात । Russia- Ukraine War